गर्दीवर नियंत्रण मिळविताना पोलिसांची दमछाक
पहिल्या पर्वणीतील कडेकोट बंदोबस्ताचा भाविकांना आणि स्थानिकांना फटका बसल्याची ओरड झाल्यामुळे कुंभमेळ्यातील दुसऱ्या पर्वणीत त्यामध्ये करण्यात आलेली शिथिलता भाविकांसाठी ‘पर्वणी’ ठरली तरी ती यंत्रणेच्या काळजाचा ठोका चुकविणारी ठरली. नाशिकच्या शाही मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने भाविक शिरल्याने मार्गावर काही ठिकाणी बिकट परिस्थिती निर्माण झाली. तर, मिरवणुकीत सहभागी होण्याच्या वादातून साधूंनी परस्परांवर तलवारी उपसल्या. हाच गोंधळ साधू-महंत स्नानासाठी गोदा काठावर आल्यानंतरही उडाला. अनेकांनी भाविकांसाठी असणाऱ्या गौरी पटांगण घाटावर धाव घेत स्नान केले. त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थावर साधू-महंतांसमवेत भाविक स्नानासाठी आल्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. या पर्वणीस नाशिक-त्र्यंबक येथे दोन्ही मिळून सुमारे ४० लाख भाविकांनी हजेरी लावल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
एकविसाव्या शतकातील दुसऱ्या कुंभमेळ्यातील दुसरी शाही पर्वणी रविवारी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे पार पडली. पहिल्या पर्वणीत पोलिसांच्या बंदोबस्तावर अनेकांनी आक्षेप घेतल्यामुळे यावेळी यंत्रणेने बहुतांश नियमांना फाटा दिला. पहिल्या शाही मिरवणुकीत भाविकांना रस्त्याच्या दुतर्फा उभे राहण्यासही मज्जाव करण्यात आला होता. स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना गोदाकाठावरील गर्दी लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने सोडण्यात आले होते. तथापि, यावेळी त्या विपरित चित्र दिसले.
त्र्यंबक येथे पहाटे चार वाजता तर नाशिक येथे सकाळी सहा वाजता अभूतपूर्व उत्साहात मिरवणुकीला सुरूवात झाली. तुतारीची सलामी, ढोल ताशांचा गजर, बँड पथकाची साथ, सियावर रामचंद्रकी जय आणि हर हर महादेवचा जयघोष, सजविलेल्या रथावर आरूढ महंत, साहसी खेळांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण असे वेगवेगळे पदर दोन्ही मिरवणुकीला लाभले. लक्ष्मीनारायण मंदिरासमोरील चौकात दिगंबर आखाडय़ाचे रथ मार्गक्रमण करत असताना दुसऱ्या मार्गाने अन्य महंतांनी आपले रथ मिरवणुकीत आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्हीकडील साधूंनी परस्परांवर तलवारी उपसल्या. पोलिसांनी मध्यस्ती करत हा वाद मिटविला. त्र्यंबकेश्वर येथेही नाशिकपेक्षा वेगळी स्थिती नव्हती. त्र्यंबकेश्वर येथेही नाशिकपेक्षा वेगळी स्थिती नव्हती. त्र्यंबक येथे भाविकांची अफाट गर्दी झाल्याने शहराबाहेर खंबाळे येथे प्रवाशांनी भरलेल्या बसगाडय़ा थांबवून ठेवण्यात आल्या.

सिंहस्थातून परतणाऱ्या तीन भाविकांचा अपघातात मृत्यू
वणी : नाशिक-पेठ रस्त्यावरील रासेगाव येथे रविवारी सकाळी तिहेरी अपघातात सिंहस्थ कुंभमेळ्यात सहभागी होऊन परतणारे तीन ठार तर तीन जण जखमी झाले. मृत व जखमी हे गुजरातमधील सिल्व्हासा येथील आहेत. पारख कुटुंबिय कुंभमेळ्यासाठी नाशिक येथे आले होते. रविवारी सकाळी मोटारीने ते सिल्व्हासाला निघाले. रासेगाव येथे दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात समोरून आलेल्या आयशर टेम्पोने मोटारीला धडक दिली. या अपघातात गोविंदराम पारख (३०), विकी पारीख (१०) आणि श्रावण कुमार (३२) हे ठार झाले. तर रामदेवहरी पारीख, मंजुदेवी पारीख आणि रवींद्र हे तीन जण जखमी झाले.