नाशिक – व्यावसायिकाचे बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करत खंडणी वसूल करणाऱ्या चार संशयितांना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखा एकला यश आले. संशयितांकडून पोलिसांनी तीन लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांना मुद्देमालासह मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. निकु उर्फ निखील दर्यानानी यांचे अपहरण करुन जिवंत सोडण्यासाठी संशयितांनी एक कोटी रुपयाच्या खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर संशयितांना १५ लाख रुपये रोख देण्यात आले होते. याप्रकरणी तक्रारीनंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखा एकचे पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देत बाजूच्या सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी केली.
चार दिवसांच्या तांत्रिक विश्लेषणानंतर संशयितांची माहिती हाती लागली. निफाड तालुक्यातील कसबे सुकणे, छत्रपती संभाजीनगर येथील वाळुंज औद्योगिक वसाहतीत संशयितांचा शोध घेण्यात आला. अखेर गुन्हे शाखा एकच्या पथकाने नाशिकजवळील विल्होळी भागात सापळा रचत मोहंमद सय्यद (३०, रा. नानावली, नाशिक), सादिक सय्यद (३९, रा. लेखानगर, नाशिक) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाख ८८ हजार रुपये रोख आणि भ्रमणध्वनी असा तीन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दर्यानानी यांच्या भावाच्या दुकानावर काम करणारे अल्फरान शेख आणि अहमद शेख यांनी अपहृत व्यक्तीविषयी माहिती दिल्याचे ताब्यात घेतलेल्या संशयितांनी सांगितले. दर्यानानी यांचे अपहरण करुन त्याच्याकडून खंडणी मागितल्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील अल्फरान आणि अहमद यांना वडाळागाव भागातून ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गु्न्हे शाखा एकच्या पथकाने संशयितांना मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात दिले.