मालेगाव : तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या बनावट आदेशाच्या आधारे महापालिकेतून तब्बल १०४४ बनावट जन्म प्रमाणपत्रे प्राप्त केल्याप्रकरणी येथील किल्ला पोलीस ठाण्यात मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच महिन्यात जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी दाखल झालेला मालेगावातील हा चौथा गुन्हा आहे.
वेळेवर जन्म नोंद होऊ न शकलेल्या नागरिकांना कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये विलंबाने जन्म प्रमाणपत्रे देण्याची कार्यपद्धती आहे. त्यानुसार बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने येथे मोठ्या प्रमाणावर बनावट जन्मदाखले वितरित झाल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यानुसार येथील छावणी पोलीस ठाण्यात यापूर्वी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तिन्ही प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडून आदेश प्राप्त केले गेले. नंतर त्या आदेशांच्या आधारे महापालिकेकडून जन्म प्रमाणपत्रे मिळविल्याचा संशय आहे. ताज्या प्रकरणात कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचा आदेशच बनावट बनवून महापालिकेकडून जन्म प्रमाणपत्र मिळविल्याचा संशय आहे.
गेल्या आठवड्यात मालेगावात आलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या संदर्भात तक्रार केली होती. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री आहेर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अशाप्रकारे जन्म प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या १०४४ जणांपैकी २१७ जणांचा ठावठिकाणा लागत नसून ४० जणांनी या जन्म प्रमाणपत्रांच्या आधारे पारपत्र मिळविले आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.