अरुणाचलच्या राज्य फुलाचा हरसूलमध्ये बहर!

दुर्मिळ  ‘फॉक्सटेल ऑर्किड ‘ जगविण्याची गरज

दुर्मिळ  ‘फॉक्सटेल ऑर्किड ‘ जगविण्याची गरज

नाशिक : त्र्यंबकेश्वर जवळील हरसूल परिसरातील जंगलात दुर्मीळ होत चाललेली ‘फॉक्सटेल ऑर्किड ‘अर्थात सीतेची वेणी ही वनस्पती बहरली असून तिच्या फुलातील मध चाखण्यासाठी पक्षी, फुलपाखरू आणि कीटक गर्दी करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ही वनस्पती अरुणाचल प्रदेशचे राज्यफु ल आहे. दुर्मीळ अशी ही वनस्पती जगविण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे.

सीतेची वेणी वर्णन अतिशय सार्थ आहे. कारण दंडगोलाकृती माळलेल्या फुलाचा गजरा कधी कधी वरच्या बाजूला थोडा फुगीर आणि खाली निमुळता होत जातो. तेव्हा कोल्ह्य़ाच्या केसाळ शेपटीची आठवण करून देतो. या वनस्पतींची फुले एखाद्या घोसाप्रमाणे

दिसतात. एका घोसात १०० पेक्षा जास्त गुलाबी ठिपके असलेली पांढऱ्या रंगाची फुले असतात. फुलोरा हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला येतो. ही वनस्पती जंगलात किंवा जंगलाच्या सीमेवर ३०० ते १५०० मीटर उंचीवर वृक्षांच्या खोडांवर उगविणारे एक बांडगुळ आहे. ईशान्य  भारत, ओदिशा आणि आंध्र प्रदेशात ही वनस्पती अधिक आढळते.

सध्या ही वनस्पती भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.‘फॉक्सटेल ऑर्किड ‘या नावाने ओळखली जाणाऱ्या या वनस्पतीची ‘ रॅन्कोस्टायलिस रेटुसा ‘ अशीही ओळख असून अरुणाचल प्रदेश आणि आसाम प्रांताचे राज्यफूल म्हणून ती ओळखली जाते. आसाममध्ये ही वनस्पती कोपौ फूल म्हणून लोकप्रिय आहे आणि ती बिहू नर्तकांच्या पोशाखांचा अविभाज्य भाग आहे.

ही वनस्पती प्रेम, प्रजनन आणि आनंद यांचे प्रतीक मानली जाते. त्यामुळेच या वनस्पतीच्या फु लांना पारंपरिक आसामी विवाह सोहळ्यात महत्त्वाचे स्थान आहे. ही वनस्पती औषधी असून दमा आणि क्षयरोगावरील उपचारांसाठी या वनस्पतीपासून बनवलेल्या औषधाचा उपयोग केला जातो. तसेच जखमा भरून येण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो. रसना या नावाने या वनस्पतीचे मूळ संपूर्ण भारतीय उपखंडात संधिवातावर उपचार करण्यासाठी वापरले जाते.

मोठय़ा  झाडांवर वाढणाऱ्या ऑर्किडबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. मुख्यत: ऑर्किड हे बांडगूळ आहे असा समज आहे. ऑर्किड ही काही फक्त दुसऱ्या झाडांवरच वाढतात असे नाही. ती जमिनीतून येतात, दगडातून येतात, पालापाचोळ्यातूनही येतात. त्यांना आपली मुळे रोवण्यासाठी छोटय़ा जागेची गरज असते. झाडावर वाढणारी ऑर्किड ही ‘एपीकाइट’ या वर्गात मोडते. म्हणजे ती फक्त आधारासाठी दुसऱ्या मोठय़ा झाडाचा वापर करतात. या झाडाच्या खाचांमध्ये एकदा का त्यांची मुळे घट्ट बसली की हवेतील बाष्प आणि प्राणवायू घेऊन ती वाढीला लागतात. ती त्या झाडाकडून अन्नाची अपेक्षा करत नाहीत. स्वत:चे अन्न ते स्वत:च बनवतात.

सीतेची वेणी मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे आणि तिच्या फुलांच्या सौंदर्यामुळे अनेक पर्यटक ही वनस्पती  जंगलातून थेट आपल्या बगीचामध्ये लावत असल्याने दुर्मीळ होऊ लागली आहे.यामुळे ही वनस्पती भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.तिला वाचविण्यासाठी वन विभागाने पावले उचलणे आवश्यक आहे.

– प्रा. आनंद बोरा (अध्यक्ष, नेचर क्लब ऑफ नाशिक)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Foxtail orchid flower plant found in the forest of harsul area zws