लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : महायुतीत नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा महिनाभराचा कालावधी उलटूनही सुटत नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. छगन भुजबळ हे स्पर्धेतून बाजूला झाल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात होते. तथापि, अद्याप उमेदवाराची घोषणा होऊ शकलेली नाही. कारण, नाशिकप्रमाणे ठाणे लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात संघर्ष सुरू आहे. तडजोडीत ठाण्याच्या बदल्यात नाशिकची जागा भाजपला सोडली जाऊ शकते, असे अनेकांना वाटते. एकंदर परिस्थितीत नाशिकच्या जागेचे भवितव्य ठाण्याच्या जागेवर अवलंबून असल्याचे दिसत आहे.

नाशिकच्या जागेसंदर्भात चर्चा करण्यासाठी शिंदे गटाचे खासदार तथा इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे आणि जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी पुन्हा दोन दिवस मुंबईत मुक्काम ठोकला होता. रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची भेट होऊन सविस्तर चर्चा झाली. गोडसे यांच्याविषयी सुरुवातीला मित्रपक्षाकडून नाराजीचे सूर उमटले होते. या जागेवर शिंदे गट विजयी होईल की नाही, याविषयी मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली. गोडसे यांनी विजयाची खात्री दिली. शिंदे गटातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या नावाला पसंती दिली आहे. मतदारसंघात चांगला जनसंपर्क राखला. विकास कामे केली. संघटना बांधणी केली आहे. उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराची एक फेरी पूर्ण केल्याचा दाखला गोडसेंनी दिला. चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी आपल्या नावाला हिरवा कंदील दाखविला, दोन-तीन दिवसात नाशिकच्या जागेची अधिकृत घोषणा केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे गोडसे यांचे म्हणणे आहे.

आणखी वाचा-सप्तश्रृंग गडावर साडेपाच लाखाचे भेसळयुक्त गोडपदार्थ जप्त

महायुतीत नाशिक आणि ठाणे या दोन्ही जागेवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून ठाणे, नाशिकच्या जागेवर दावा सांगितला गेल्याने तिढा निर्माण झाला. स्थानिक पातळीवरील संख्याबळ दाखवत भाजप नाशिक हा आपला बालेकिल्ला असल्याचा दावा आधीपासून करीत आहे. अलीकडेच उमेदवारीच्या स्पर्धेतून छगन भुजबळ यांनी माघार घेतली. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाने नाशिकवरील दावा सोडलेला नाही. ठाणे, नाशिकच्या जागा वाटपात तडजोडीची वेळ आल्यास शिवसेनेकडून ठाण्याची जागा राखण्यास प्राधान्य दिले जाईल. कारण, ठाणे हा मुख्यमंत्री शिंदे यांचा जिल्हा आहे. या परिस्थितीत नाशिकची जागा भाजपसाठी सोडावी लागेल, असा अनुमान भाजपच्या स्थानिक वर्तुळातून काढला जात आहे. त्या अनुषंगाने या जागेसाठी भाजप सर्वार्थाने संपन्न, प्रबळ उमेदवाराची चाचपणी करीत आहे. तडजोडीत ही जागा गमवावी लागू शकते, हे शिंदे गटातील काही पदाधिकारी नाकारत नाहीत. अनेकांना मुख्यमंत्री ठाणे आणि नाशिक या दोन्ही जागा शिंदे गटासाठी सोडवून घेतील, असा विश्वास वाटत आहे.

आणखी वाचा-भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह

उमेदवार जाहीर न होण्याचे कारण

नाशिक लोकसभा मतदारसंघावर महायुतीकडून तीनही पक्षांकडून हक्क सांगितला गेल्याने उमेदवार अजूनही जाहीर होऊ शकलेला नाही. भाजप, शिंदे गट, अजित पवार गट हे तीनही पक्ष जागा आपल्यालाच सुटेल, असा विश्वास बाळगून आहे. ठाणे मतदारसंघाबाबतही असाच वाद आहे. ठाणे आणि नाशिक या जागांवरुन शिंदे गट आणि भाजप यांच्यात देवघेव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच अजूनही नाशिकच्या जागेसाठी इच्छुकांना ताटकळत ठेवले जात असल्याचे चित्र आहे.