नाशिक : शहरातून वाहणाऱ्या नंदिनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी दोंदे पूल ते गोविंदनगपर्यंत नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर गॅबियन पध्दतीची भिंत बांधून सुशोभिकरण करण्यासाठी २० कोटी ३७ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याचा प्रशासकीय ठराव मंजूर करून तो महापालिकेने स्मार्ट सिटी कंपनीकडे पाठविला आहे. नंदिनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी सत्कार्य फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत होती. गॅबियन भिंत बांधण्याचा महत्त्वकांक्षी प्रकल्प नंदिनीच्या जतन आणि संवर्धनासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासही त्यामुळे मदत होणार आहे. अतिक्रमण, सांडपाणी, घाण, कचरा यामुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होवून नंदिनी नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. ही नदी शेवटी गोदावरी नदीला जावून मिळत असल्याने गोदावरीही प्रदूषित होते. नंदिनीचे पर्यायाने गोदावरीचे प्रदूषण थांबावे, यासाठी दोंदे पूल ते गोविंदनगर म्हणजेच मुंबई नाका सव्र्हिस रोडपर्यंत दोन्ही किनाऱ्यांवर गॅबियन भिंत बांधण्यात यावी, सुशोभिकरण करावे, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्यां चारुशीला गायकवाड (देशमुख) यांनी केली होती. या संदर्भात महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनी यांना निवेदनही देण्यात आले होते. याबाबत प्रस्ताव आणि प्रशासकीय ठराव पाठवावा, असे स्मार्ट सिटीने महापालिकेला कळविले होते. शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या सततच्या पाठपुराव्यानंतर दोंदे पूल ते गोविंदनगपर्यंत खासगी जागा वगळून २० कोटी ३७ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी २७ मे २०२२ च्या प्रशासकीय महासभेवर या प्रस्तावाला मंजुरी दिली. ३१ मे रोजी प्राप्त झालेला हा ठराव पुढील कार्यवाहीसाठी स्मार्ट सिटीकडे पाठविण्यात आला आहे. नंदिनी नदी वाचविण्यासाठी अखेरीस कार्यवाही सुरु झाल्याबद्दल सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, शिवसेना कार्यकर्त्यां चारुशीला गायकवाड, बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर आदींनी समाधान व्यक्त केले आहे. नंदिनी नदी ही गोदावरी नदीलाच जावून मिळते, तिचे जतन, संवर्धन होईलच, पर्यायाने गोदावरीचेही प्रदूषण रोखण्यास या प्रकल्पाने मदत होणार आहे. या दोन्ही नद्यांच्या रक्षणासाठी आणि नाशिककरांच्या आरोग्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. - चारुशीला गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या