धुळे : यावेळी सादर झालेला अर्थसंकल्प खान्देशच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना देऊ शकणारा, आशावादी असून खऱ्या अर्थाने ‘गेम चेंजर’ ठरणारा ठरू शकेल असे सकारात्मक अंदाज लावण्यात येत आहेत. या अंदाजानुसार घडामोडी घडल्यास आगामी दहा वर्षात उत्तर महाराष्ट्र जगाच्या नकाशावर येऊ शकेल.
केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी २०२६ रोजी सादर करण्यात आला. उत्तर महाराष्ट्र आणि विशेषतः नंदुरबार, धुळे व जळगाव या खान्देशातील जिल्ह्यांसाठी हा अर्थसंकल्प पुढील दहा वर्षांच्या विकासाचा दिशादर्शक ठरणार असल्याचे चित्र आहे. पायाभूत सुविधा, दळणवळण आणि औद्योगिक गुंतवणुकीवर दिलेल्या भरामुळे खान्देशाच्या औद्योगिक भविष्याला नवी गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेला दांकुनी (कोलकाता) ते सुरत पूर्व–पश्चिम समर्पित मालवाहू कॉरिडॉर (ईडब्ल्यूडीएफसी) हा प्रकल्प खान्देशासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या कॉरिडॉरमुळे खान्देशात नवीन उद्योग, ड्राय पोर्ट, लॉजिस्टिक्स हब आणि वाहतूक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
या मार्गामुळे पालघर, जेएनपीटी, हाजीरा, दहेज, मुंद्रा आणि पीपावाव या प्रमुख बंदरांचा थेट संपर्क पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांशी होणार आहे. विशेष म्हणजे डबल-स्टॅक मालवाहू रेल्वे अवघ्या ३० तासांत कोलकाता ते सुरत हा प्रवास पूर्ण करणार असल्याने उद्योगांना वेळ आणि खर्च दोन्हींची मोठी बचत होणार आहे.
काय घडू शकेल…
धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे जिल्हे एकीकडे पूर्व–पश्चिम समर्पित मालवाहू कॉरिडॉर (ईडब्ल्यूडीएफसी) तर दुसरीकडे दिल्ली–मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (डीएमआयसी) मध्ये समाविष्ट होत असल्याचे दिसूलागले असून यामुळे देशातील इतर अनेक जिल्ह्यांच्या तुलनेत या भागात अधिक स्पर्धात्मक घडामोडी घडतील आणि हा भाग सर्वार्थाने सोयीचा ठरण्याची शक्यता आहे. यामुळे देशी-विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आकर्षित होऊ शकेलच शिवाय रोजगारनिर्मिती वाढेल आणि खान्देशाचा औद्योगिक नकाशा पूर्णतः बदलू शकतो असे अंदाज जाणकरांनी लावले आहेत.
कारण यंदाच्या अर्थसंकल्पात दळणवळण क्षेत्रालाही प्राधान्य देण्यात आले आहे. मनमाड–इंदूर रेल्वे लाईनसारख्या महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पामुळे मध्य भारत आणि उत्तर महाराष्ट्रातील संपर्क अधिक मजबूत होणार आहे. तसेच धुळे येथून विमान सेवा सुरू होण्याच्या दृष्टीनेही आता लवकरच सकारात्मक हालचाली सुरु होऊ शकतील असे म्हणण्यास वाव आहे. भविष्यात हवाई दळणवळण उपलब्ध झाल्यास उद्योग, व्यापार आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक आणि लॉजिस्टिक्स यांची साखळी मजबूत झाली तर खान्देश हा उत्तर महाराष्ट्राचा विकासकेंद्र म्हणून उदयास येईल.
एकूणच, २०२६ चा अर्थसंकल्प उत्तर महाराष्ट्रासाठी प्रचंड आशावादी असून, येणारी दहा वर्षे खान्देशसाठी सुवर्णसंधी ठरणार आहेत. योग्य नियोजन, पायाभूत सुविधांची वेळेत अंमलबजावणी आणि प्रशासनाची सक्रिय भूमिका लाभल्यास खान्देश देशाच्या औद्योगिक विकासात अग्रस्थानी पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

