नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत चालक पदासाठीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन तालुक्यातील टेहरे येथील राजेंद्र बाळासाहेब शेवाळे या तरूणास सात लाखाचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी छावणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

संशयितांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अव्वल कारकुनाचा समावेश आहे.

दाभाडी येथील बंडु बाबुराव सूर्यवंशी व सिताराम भागा निकम तसेच नाशिक येथील विनायक शेट्टी, रवींद्र मोरे व श्रीकांत पाळदे अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. अंशकालिन चालकाची कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून जानेवारी २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत सात लाखाची रक्कम हडप करून फसवणूक केल्याचा या सर्वावर आरोप आहे. ओळखीतल्या असणाऱ्या बंडु व सिताराम या दोघांनी विनायक शेट्टी या मध्यस्थामार्फत फसवणूक झालेल्या राजेंद्रची रवींद्र मोरे व श्रीकांत पाळदे यांच्याशी भेट घडवून आणली होती. यातील रवींद्र मोरे हा जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी तथा निवड समितीचा सचिव असून श्रीकांत पाळदे हा नायब तहसीलदार व विनायक शेट्टी हा कारकुन असल्याची बतावणी करण्यात आली. संशयितांच्या बतावणीला बळी पडत पैसे दिल्यावर राजेंद्रला नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने सुरगाणा तहसील कार्यालयात अंशकालिन चालक पदी नियुक्तीचे पत्र दिले गेले. या नियुक्तीपत्रासोबत जिल्हाधिकारी कार्यालय व महसूल आयुक्तालयाच्या नावाचे शिफारसपत्रे, राज्य शासनाच्या अर्थ मंत्रालयातील प्रधान सचिव विद्याधर कानडे यांच्या नावाने काढलेली अधिसूचना, जिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र आदी कागदपत्रे देखील दिले गेले. परंतु हे नियुक्तीपत्र घेऊन राजेंद्र हा सुरगाणा येथे रूजू होण्यासाठी गेला, तेव्हा हे नियुक्तीपत्र व सोबत दिलेले अन्य सर्व दस्तावेज बनावट असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पैसे परत मिळण्यासाठी त्याने दाभाडी येथील बंडू व सिताराम यांच्याकडे लकडा लावला. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट या दोघा संशयितांनी त्यालाच शिवीगाळ व दमदाटी सुरू केली असे या संदर्भात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीनुसार पोलिसांनी पाचही संशयितांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. न्यायालयाने या संशयितांची आठ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील रवींद्र मोरे हा संशयित जिल्हाधिकारी कार्यालयात अव्वल कारकुन असून श्रीकांत पा़ळदे हा ‘सेतू’ केंद्रात संगणक चालक असल्याचे निष्पन्न झाल्याचे या प्रकरणाचे तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक सारंग चव्हाण यांनी सांगितले.