गॅस तपासणीचा नाहक भरुदड

ग्राहकांवर दीडशे रुपयांचा बोजा

lpg. subsidy
संग्रहित छायाचित्र
ग्राहकांवर दीडशे रुपयांचा बोजा

सुरक्षिततेसाठी घरगुती गॅसची वर्ष-दोन वर्षांतून तपासणी करणे तसे आवश्यकच आहे.  भारत पेट्रोलियम कंपनीने गॅस जोडणीची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत शहरात चाललेली तपासणी ही वरकरणी होत असून त्यासाठी १५० रुपये शुल्क आकारले जाते आहे, अशी ग्राहकांची तक्रार आहे. तपासणी योग्य पद्धतीने होत नसल्याने ग्राहकांनी ते देण्यास नकार दिल्यास पुढील काळात सिलिंडरची नोंदणी करताना अडचणी येतील, असा इशारा संबंधितांकडून देण्यात येत असल्याने ग्राहकांनी चिंता व्यक्त केली आहे.

घरगुती गॅस जोडणीतील सिलिंडर, रेग्युलेटर, रबरी नळी, गॅस शेगडी, स्वयंपाकाचा ओटा, स्वयंपाकघरातील प्रकाश, हवा याबद्दल आजही कित्येक ग्राहक अज्ञानी असतात. गॅस जोडणीतील साधने हाताळण्याची माहिती नसल्याने काही गंभीर अपघात घडल्याची उदाहरणे आहेत. अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात. या पाश्र्वभूमीवर भारत पेट्रोलियमने वितरकांच्या मदतीने घरगुती गॅस जोडणीविषयक ग्राहक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमाची माहिती आधीच लघुसंदेशाद्वारे ग्राहकांच्या भ्रमणध्वनीवर देण्यात आली. त्यानुसार ही तपासणी प्रत्येक ग्राहकाला अनिवार्य आहे. त्याकरिता लवकरच आमचा तंत्रज्ञ तपासणीसाठी येईल. त्याचे ओळखपत्र पाहून तपासणीसाठी सहकार्य करावे आणि १५० रुपये देऊन त्याची पावती घ्यावी, असे आवाहन बऱ्हाटे गॅस एजन्सीने सिडको व परिसरातील ग्राहकांना केले. भारत गॅस कंपनीच्या इतर वितरकांकडून याच पद्धतीने ही मोहीम सुरू आहे. खरे तर घरातील गॅस जोडणीच्या व्यवस्थेची तपासणी ग्राहकांच्या दृष्टीनेही उपयुक्त. दैनंदिन रहाटगाडय़ात दररोज वापरल्या जाणाऱ्या व्यवस्थेकडे तितक्या गांभीर्याने पाहिले जात नाही. यानिमित्ताने गॅस जोडणीची सखोल तपासणी होईल, ही ग्राहकांची अपेक्षा मात्र फोल ठरली आहे.

साधने सुस्थितीतांना तपासणीची गरज नाही

भारत गॅसच्या निर्देशानुसार तपासणी सुरू आहे. घरात सिलिंडर कशा पद्धतीने ठेवलेले आहे, रेग्युलेटरला नळी योग्य पद्धतीने जोडलेली आहे काय, गॅस नळी पाच वर्षांची गॅरेंटी असलेली व ‘आयएसआय मार्क’ची आहे काय, ती योग्य लांबीची आहे का, गॅस शेगडीची स्थिती, तिचे आयुर्मान, शेगडी सिलिंडरपेक्षा उंच जागी ठेवली आहे की नाही, स्वयंपाक घर हवेशीर आहे का, एकाच रेग्युलेटरला दोन शेगडय़ा जोडल्या आहेत काय, याची तपासणी केली जात आहे. ग्राहकाच्या घरातील सर्व साधने सुस्थितीत असतील तर त्याला तपासणीची गरज नाही. संबंधिताने अर्जावर तसे लिहून देणे आवश्यक आहे.   किशोर सरोदे, व्यवस्थापक, बऱ्हाटे गॅस एजन्सी

शुल्कास नकार देताच अडचणीचा इशारा

गॅस जोडणी तपासणीच्या नावाखाली १५० रुपये घेऊन योग्य पद्धतीने तपासणी केली जात नसल्याची ओरड ग्राहक करीत आहेत. यामुळे काही ग्राहकांनी तपासणीची रक्कम देण्यास नकार दिला. त्या वेळी या तंत्रज्ञांनी हे शुल्क न दिल्यास सिलिंडर मिळताना अडचणी येतील, असा अप्रत्यक्षरीत्या इशारा दिल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

योग्य, अयोग्याची खातरजमा नाही

सिडकोत कंपनीच्या तंत्रज्ञांनी हाती घेतलेले तपासणीचे काम निव्वळ दिशाभूल करणारे असल्याची तक्रार ग्राहकांनी केली. पवननगर भागात तंत्रज्ञाने घरी आल्यावर सिलिंडर व नळीची पाहणी केली. लगेच अर्ज भरून घेत १५० रुपयांची मागणी केल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात आले. तपासणी न करता पैसे कशाचे द्यायचे, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला. काही ठिकाणी तंत्रज्ञांनी नळी कधी बसविली याची विचारणा करत ती बदलण्याचा सल्ला दिला, परंतु ती योग्य आहे की अयोग्य याची खातरजमाही केली नसल्याचे ग्राहकांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Gas connection checking from bharat petroleum