नाशिक : आंतरराष्ट्रीय पातळीवरील युध्दजन्य परिस्थिती आणि एलपीजी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा निर्माण झालेला तुटवडा, यामुळे धाकधूक वाढली असतानाच नेमक्या या परिस्थितीत घरगुती गॅस सिलिंडर नोंदणीचा कालावधी वाढविण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परिणामी, घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण होईल की काय, या भीतीमुळे ग्राहकांनी गॅस सिलिंडर वितरकांपुढे रांगा लावल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे.
घरगुती गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा असून पुरवठा नियममितपणे होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आश्वस्त करण्यात आल्यावरही ग्राहकांमध्ये भीती कायम आहे. त्यामुळेच गॅस सिलिंडर वितरकांपुढील रांगा कमी होण्यास तयार नाहीत. नाशिक जिल्हा प्रशासनाने आता घरगुती गॅस सिलिंडर नोंदणीनंतर (बुकिंगनंतर) साधारणतः २ ते ३ दिवसांत सिलिंडर ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येतील. नागरिकांनी गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे. परंतु, त्यासाठी ग्राहकांनी एक गोष्ट करणे आवश्यक आहे.
सध्या काही ठिकाणी गॅस वितरणाबाबत संभ्रम निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नशिक जिल्हा प्रशासनाने परिस्थिती स्पष्ट केली आहे. गॅस वितरणाची प्रक्रिया नियमितपणे सुरू असून नागरिकांनी संयम राखून अधिकृत माध्यमातूनच सिलिंडरसाठी नोंदणी करावी,असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने गॅस वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
गॅस वितरणासंदर्भात काही अडचण असल्यास नागरिकांनी (०२५३) २३१७१५१ या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ज्या ग्राहकांनी अद्यापपर्यंत केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी तातडीने केवायसी करून घ्यावी. त्यामुळे गॅस वितरण प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी गॅस सिलिंडर बुकिंगसाठी उपलब्ध असलेल्या डिजिटल आणि दूरध्वनी सुविधांचा वापर करून घरबसल्या बुकिंग करावे. गॅस एजन्सींवर अनावश्यक गर्दी टाळून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा अहिरे यांनी केले आहे.
गॅस बुकिंगसाठी उपलब्ध सुविधा – एचपीसीएल (HPCL)
व्हॉट्सअप –९२२२२०११२२, मिस्ड कॉल– ९४९३३६०२२२२, एचपी पे ॲपव्दारे बुकिंग, कॉल बुकिंग –८८८८८२३४५६, ऑनलाईन – www.hindustanpetroleum.com/myhpgas.in याशिवाय इतर माध्यम – जीपे, फोनपे, ॲमेझाॅन पे यांचा वापर करता येईल.
आयओसीएल (IOCL) करिता गॅस बुकिंग
व्हॉट्सअप – ७५८८८८८८२४, मिस्ड कॉल – ८४५४९५५५५५, एसएमएस/आयव्हीआर – ७७१८९५५५५५, ऑनलाईन – cx.indianoil.in याशिवाय इतर माध्यम – जीपे, फोनपे, ॲमेझाॅन पे.
बीपीसीएल (BPCL) करिता गॅस बुकिंग
व्हॉट्सअप – १८००२२४३४४, मिस्ड कॉल– ७७१०९५५५५५, आयव्हीआरएस– ७७१५०१२३४५, ७७१८०१२३४५, हॅलो बीपीसीएल ॲप, ऑनलाईन – www.bharatgas.com/bharatpetroleum.in याशिवाय इतर माध्यम – जीपे, फोनपे, ॲमेझाॅन पे याव्दारे नागरिकांना नोंदणी करता येईल, असे नाशिक जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
