अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

नाशिक : करोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्य़ात टाळेबंदी लागू करण्यात आल्याने बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद असतांना दुकानांमध्ये शॉर्ट सर्किटचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी सीबीएस परिसरातील एका खाद्य दुकानास आग लागली. तसेच गॅस सिलिंडर गोदामातील सिलिंडरने अचानक पेट घेतला. अग्निशमन दलाच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला. मानूर शिवारातील आडगाव रस्त्यावर यश हेंबाडे यांचे बापू गॅस गोदाम आहे. या गोदामात ५०० पेक्षा अधिक सिलिंडर आहेत. गुरुवारी सकाळी या गोदामातील एका सिलिंडरमधून गळती सुरू झाली. त्याने अचानक पेट घेतला. हा प्रकार लक्षात येताच गोदामातील कर्मचारी घाबरले. त्यांनी तातडीने अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. नाशिकरोड येथील अग्निशमन विभागाकडून एक बंब तातडीने घटनास्थळी पोहचला. अग्निशमन दलाचे कर्मचारी राजेंद्र जाधव, राजेंद्र खर्जुल, संजय पगारे आदींनी पेटते सिलिंडर आणि आगीची झळ लागलेले ११ सिलिंडर तत्काळ गोदामातून बाहेर काढल्याने अनर्थ टळला.

गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दुसरी घटना घडली. मध्यवर्ती बस स्थानकासमोरील गोली वडापाव हे दुकान बंद असतांना इलेक्ट्रिक भट्टीच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाले. यामुळे वायर जळण्यास सुरुवात झाली. दुकानातून धूर निघू लागताच परिसरातील नागरिकांनी याबाबत अग्निशमन विभागाला माहिती दिली. मुख्यालयाचा एक बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. दुकानाचे शटर तोडत मदत कार्यास सुरूवात झाली. त्यावेळी शेजारील दुसऱ्या दुकानातूनही धूर येत असल्याचे दिसले. अग्निशमन विभागाच्या इकबाल शेख, राजेंद्र पवार, सोमनाथ थोरात, इसाक शेख, ज्ञानेश्वर दराडे, विजय शिंदे, गणेश गायधनी यांनी तातडीने दोन्ही दुकानात असलेली पाच सिलिंडर तातडीने बाहेर काढली. त्यामुळे आग पसरण्याआधीच नियंत्रणात आणली गेली.