महिला सक्षमीकरणाच्या वेगवेगळ्या वाटा शोधणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) आता अधिकाधिक लोकांपर्यंत सरकारी योजना पोहोचाव्यात यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी खास हक्क दर्शक प्रणाली तयार केली आहे. ही यंत्रणा भ्रमणध्वनीच्या माध्यमातून कार्यान्वित करीत नागरिकांना ते कोणत्या योजनेसाठी पात्र आहेत याची माहिती घरबसल्या दिली जाणार आहे.
टाटा फाऊंडेशनच्या सहकार्याने माविमने साधारणत: पाच ते सहा महिन्यांपूर्वी ग्रामीण भागातील महिला ई-साक्षर व्हाव्यात यासाठी इंटरनेट साथी उपक्रम हाती घेतला. या उपक्रमासाठी भ्रमणध्वनी व टॅब संस्थेने वितरित केले. या उपक्रमास लाभलेला प्रतिसाद लक्षात घेऊन हा उपक्रम आता ‘हक्क दर्शक’च्या स्वरूपात पुढे आणण्यात आला आहे.




या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील ३५ हून अधिक महिलांना प्रशिक्षण दिले जात असून भ्रमणध्वनीवर अर्ज कसा भरायचा, त्यासाठी इंग्रजी व मराठी माध्यमाचा वापर कसा करता येईल, आवश्यक तपशील कसा मिळवायचा याची माहिती माविमचे पदाधिकारी देत आहेत. या माध्यमातून माहिती देवाणघेवाणीचे मूल्य अर्थात अर्ज भरत संबंधित व्यक्तीला आवश्यक तो तपशील मिळण्यासाठी माविमच्या प्रतिनिधीला ४० रुपये प्रति अर्ज द्यावे लागणार आहेत. यामध्ये भ्रमणध्वनीवर येणारी प्रश्नावली भरल्यानंतर ती व्यक्ती सरकारच्या कोणत्या योजनांसाठी पात्र आहे, त्यासाठी त्याला कोणती कागदपत्रे लागतील, त्याचे कार्यालय कुठे आहे, अर्ज कुठून मिळवायचा हा संपूर्ण तपशील मिळणार आहे. अर्ज भरण्यापुरता हा प्रवास मर्यादित नसून ती महिला त्याचा पाठपुरावाही करणार आहे. दरम्यान, यासाठी महिलांना विशेष प्रशिक्षणाद्वारे विविध सरकारी योजनांची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करणाऱ्या महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. याबाबतची माहिती माविमचे जिल्हा समन्वयक अशोक चव्हाण यांनी दिली.
खर्चात बचत
ग्रामीण भागात आजही सरकारी योजना पोहोचलेल्या नाहीत. यासाठी या महिलांच्या मदतीने हा उपक्रम घेण्यात येत आहे. यामुळे गावातच त्यांना आवश्यक ती माहिती मिळणार आहे. तालुक्यात जाण्या-येण्याच्या खर्चात बचत होईल. यामुळे या उपक्रमास प्रतिसाद मिळेल, असा विश्वास माविमचे जिल्हा समन्वयक अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात पुढील महिन्यात हा उपक्रम सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.