मालेगाव : शिधापत्रिका मिळविण्यासाठी तालुक्यातील कौळाणे येथील अस्लम रहीम शेख या अपंगाने अनेकदा सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिझवले, परंतु प्रत्येक वेळी रिक्त हस्ते परतावे लागण्याचीच प्रचिती त्यास येत गेली. एक दिवस मात्र जणू चमत्कार झाला आणि अवघ्या तासाभरात त्याच्या हातात शिधापत्रिका पडली. बळीराजा आत्मसन्मान सेवा संघ या सेवाभावी संघटनेने घेतलेल्या पुढाकाराचे हे फलित असून त्याद्वारे या अपंगाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिधापत्रिका अभावी कुचंबना होत असल्याची तक्रार मालेगाव तालुक्यातील वऱ्हाणे परिसरातील गोरगरीब व आदिवासी समाजातील काही नागरिकांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डाॅ. प्रतापराव दिघावकर यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत डाॅ. दिघावकर यांनी बळीराजा आत्म सन्मान सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांना यात लक्ष घालण्यास सांगितले. शेतकरी व कष्टकरी समाजाचा विकास हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन डाॅ. दिघावकर यांच्या संकल्पनेतून या संघाची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार संघातर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत.

हेही वाचा : ‘धनुष्यबाणा’च्या गैरवापराबाबत शिंदे गट निवडणूक आयोगाच्या दारी, शिवसेनेची प्रतिक्रिया; म्हणाले “आमदार, खासदारांच्या…”

शिधापत्रिका नसल्याची बाब समोर आल्यावर त्या मिळवून देण्यासाठी संघातर्फे वऱ्हाणे परिसरातील गावांमध्ये विशेष शिबिरांचे प्रयोजन करण्यात आले. त्यात दीडशेच्यावर नागरिकांचे अर्ज भरुन घेण्यात आले. अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह संबधित नागरिकांना घेऊन संघाचे प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे, सचिव मोठाभाऊ दळवी, राहुल पवार, प्रतीक्षा भोसले हे पदाधिकारी तहसील कार्यालयात जाण्यासाठी निघाले होते. त्याप्रमाणे राहुल पवार हे आपल्या मोटारीने जात असताना वाटेत मोसम पूल भागात कौळाणे येथील अस्लम शेख ही अपंग व्यक्ती कसरत करत पायी जात असल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांनी मोटार थांबवून विचारपूस केली असता शिधापत्रिका काढण्यासाठी आपण तहसील कार्यालयात जात असल्याची माहिती या व्यक्तीने दिली. तसेच गेली दोन वर्षे त्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिझवत असल्याची कैफियतदेखील मांडली.

हेही वाचा : भाजपाने विरोध केलेल्या ‘आदिपुरुष’ सिनेमाला मनसेचा जाहीर पाठिंबा, म्हणाले “हे राम कदम आणि हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे…”

ही कैफियत ऐकल्यावर पवार यांनी या अपंग व्यक्तिस उचलून आपल्या मोटारीत बसवले आणि तहसील कार्यालयात नेले. तहसीलदार दीपक पाटील यांच्या समक्ष नेल्यावर शिधापत्रिकेसाठी आपणास कसे अग्निदिव्य करावे लागत आहे, हा अनुभव या व्यक्तीने त्यांना ऐकवला. त्यानंतर पाटील यांनी त्याची गंभीर दखल घेत अवघ्या तासाभरात या व्यक्तिला शिधापत्रिका उपलब्ध करून दिली. अनेकदा उंबरठे झिझवल्यावरही या ना त्या कारणाने शिधापत्रिका मिळत नव्हती. पण आता झटपट शिधापत्रिका हातात पडल्याने या व्यक्तिला सुखद धक्काच बसला. संघाचे पदाधिकारी व तहसीलदार पाटील यांचे त्यामुळे या व्यक्तिने मनापासून आभार मानले.

दरम्यान,शिबिरात मागणी केलेल्या सर्व नागरिकांचे शिधापत्रिकासाठीचे अर्ज परिपूर्ण भरुन तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले असून लवकरच त्यांना या पत्रिका प्राप्त होतील, असा विश्वास संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी लागणारे शासकीय शुल्क व कागदपत्रांसाठी लागणारा अन्य खर्च संघातर्फे करण्यात येत असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Get ration card smile at handicap person mpsc member do prataprao dighavkar malegaon nashik tmb 01
First published on: 07-10-2022 at 11:00 IST