जळगाव : सोशल मीडियावर सध्या ‘80s रेट्रो ट्रेंड’ची चांगलीच चर्चा आहे. जुन्या काळातील छायाचित्रे, त्या काळातील फॅशन, गाणी आणि आठवणींना नव्या अंदाजात उजाळा देण्याची लाट सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या ट्रेंडमध्ये सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत अनेक जण सहभागी होत असून, राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन यांचे ८०च्या दशकातील एक जुने छायाचित्र सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

गिरीश महाजन यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर महाविद्यालयीन जीवनातील जुना फोटो शेअर केला आहे. या छायाचित्रासोबत ज्येष्ठ गायक किशोरकुमार यांच्या आवाजातील लोकप्रिय हिंदी चित्रपटगीत ‘जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना…’ हे गीतही जोडण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा देतानाच या पोस्टला रेट्रो काळाचा खास रंग मिळाला आहे. छायाचित्रात गिरीश महाजन यांचा तत्कालीन तरुणाईचा अंदाज स्पष्टपणे दिसून येतो. सडपातळ शरीरयष्टी, चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि भेदक नजर यामुळे सध्याच्या राजकीय व्यक्तिमत्त्वापेक्षा त्यांचा हा जुना अंदाज वेगळाच भासत आहे. महाजन यांचा महाविद्यालयीन काळातील फोटो पाहून अनेकांना त्यांच्या तरुणपणीच्या आठवणींची झलक मिळाली आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

दरम्यान, महाजन यांच्या या पोस्टनंतर त्यांच्या समर्थकांसह सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. जुन्या छायाचित्रातील त्यांचा लूक, हेअरस्टाइल आणि एकंदर व्यक्तिमत्त्वाची चर्चा रंगली आहे. काहींनी त्यांच्या जुन्या आणि सध्याच्या छायाचित्राची तुलना करत नाशिकच्या कुंभमेळ्याशी संबंधित प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. तर काहींनी ८०च्या दशकातील महाविद्यालयीन आठवणी आणि त्या काळातील साधेपणाला या पोस्टमुळे उजाळा मिळाल्याचे म्हटले आहे.

धावपळीपासून आठवणींच्या विश्वात

गिरीश महाजन हे गेल्या काही वर्षांपासून उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे नाव राहिले आहे. विविध राजकीय आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांची कायम धावपळ सुरू असते. अशा राजकीय व्यस्ततेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या आयुष्यातील महाविद्यालयीन काळातील आठवण सोशल मीडियावर शेअर केल्याने या पोस्टकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. ‘जिंदगी एक सफर है सुहाना…’ या गीताची निवडही या छायाचित्राला साजेशी ठरली आहे. आयुष्याच्या प्रवासात मागे वळून पाहताना जुन्या आठवणींना दिलेला हा उजाळा म्हणून या पोस्टकडे पाहिले जात आहे. राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या सार्वजनिक प्रतिमेपलीकडे त्यांच्या तरुणपणीचा काळ या निमित्ताने सोशल मीडिया वापरकर्त्यांसमोर आला आहे. ८०च्या दशकातील फॅशन आणि जीवनशैली पुन्हा सोशल मीडियावर लोकप्रिय होत असताना महाजन यांचे हे छायाचित्र रेट्रो ट्रेंडला राजकीय वर्तुळाचीही जोड देणारे ठरले आहे.