मालेगाव : आरोग्य सेवा क्षेत्रात सेवाभाव जोपासत हजारो गोरगरीब रुग्णांना जीवनदान देणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, नाशिक जिल्ह्यातील रुग्णांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
मालेगाव येथील बारा बलुतेदार फाउंडेशनतर्फे अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली अत्याधुनिक ‘अडव्हान्स लाईफ सपोर्ट’ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्यात आली आहे. जळगाव येथील भाजपा कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आणि आमदार मंगेश चव्हाण, खासदार स्मिताताई वाघ,आमदार राजू भोळे व फाउंडेशनचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत या ॲम्बुलन्सचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.
मंत्री गिरीश महाजन यांनी आजवर सेवाभावी वृत्तीने हजारो गरिबांना रुग्णसेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या याच कार्याचा आदर म्हणून ही अत्याधुनिक ॲम्बुलन्स गरजू रुग्णांच्या सेवेसाठी समर्पित करण्यात येत असल्याचे बंडूकाका बच्छाव यांनी याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले.
हे तर ‘मिनी हॉस्पिटल’; काय आहेत वैशिष्ट्ये?
ही रुग्णवाहिका म्हणजे केवळ गाडी नसून एक चालते-फिरते ‘आयसीयू’ आहे. यात आपत्कालीन सेवेसाठी २४ तास स्पेशल डॉक्टर तैनात असतील. ‘यशका’ कंपनीचे अवघ्या ५०० ग्रॅम वजनाचे मोपेड ६.५ व्हेंटिलेटर यात आहे. हे ५०० ग्रॅमच्या नवजात बाळापासून ते १०० किलोपेक्षा जास्त वजनाच्या रुग्णाला २ मिली ते २००० मिलीपर्यंत अचूकतेने ऑक्सिजन पुरवू शकते.
रुग्णाचा ईसीजी, बीपी, ऑक्सिजन लेव्हल आणि शरीराचे तापमान एका मिनिटात मोजले जाईल. हृदय अचानक बंद पडल्यास पूर्ववत करण्यासाठी ‘शॉक’ देण्याची सिस्टीमचीही यात व्यवस्था करण्यात आली आहे. घशातील किंवा शरीरातील रक्त, कफ किंवा लाळ शोषून श्वसनमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी सक्शन मशीन, तर अचूक प्रमाणात औषध सोडण्यासाठी यांत्रिक सिरिंज पंपची व्यवस्था या ॲम्बुलन्समध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गरजूंना अल्प दरात सेवा
रुग्णवाहिका अचानक बंद पडली, तरी रुग्णाचा ऑक्सिजन आणि मॉनिटरिंग सिस्टीम चालू राहण्यासाठी हाय-पॉवर इन्व्हर्टर बॅकअप दिला गेला आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी ही ॲम्बुलन्स कुंभमेळा संपेपर्यंत नाशिक शहरातच तैनात ठेवली जाणार आहे. गरजू रुग्णांसाठी ही ॲम्बुलन्स अल्प दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सोहळ्याप्रसंगी मालेगाव येथील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव, लकी गिल, जे.पी.बच्छाव, नगरसेवक प्रमोद बच्छाव, बापू निकम, गजू देवरे, संजय देवरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
