नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी ३५ ते ४० हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. अनेक कामे प्रगतीपथावर असून ती मिळवणारे बहुतांश कंत्राटदार गुजरातमधील की महाराष्ट्रातील, यावरून मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपचे संकटमोचक तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्यात जुंपली आहे.

‘खड्डेमय नाशिक’वरून राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याच्या कामांत कमिशनखोरी होत असून ही कामे गुजरातच्या ठेकेदारांना दिल्याचा आरोप केला होता. यावर कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर देताना एखादी निविदा ‘मॅनेज’ करून दिल्याचे सिद्ध करून दाखवा, असे आव्हान दिले. तसेच कुंभमेळ्याची विविध कामे घेणाऱ्या कंत्राटदारांची यादीच त्यांना पाठवण्याची तयारी दर्शवली आहे.

कुंभमेळ्याच्या कामांसाठी झालेली खोदकामे आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये बिकट स्थिती झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर आलेले मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याच्या कामांमध्ये दलाली हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असून बहुतांश कामांचे ठेके गुजरातच्या ठेकेदारांना देण्यात आल्याचा आरोप केला. ‘महाराष्ट्रात ठेकेदार जन्मालाच आले नाहीत का?’ असा खोचक सवालही त्यांनी केला होता. त्यांच्या आरोपांना कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले. राज ठाकरे यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. मी त्यांना शहरात सुरू असलेली १,५०० कोटी रुपयांची कामे, नाशिक रिंग रोडसाठी (वळण रस्ता) निश्चित झालेले ठेकेदार आणि गोदावरी काठावरील घाट बांधणीच्या कामांची यादी देण्यास तयार आहे. त्यावरून त्यांनी यात बाहेरील राज्यातील ठेकेदार कोण आहेत ते सांगावे, असे मंत्री महाजन यांनी नमूद केले.

राज ठाकरे यांनी केलेला भ्रष्टाचाराचा आरोपही महाजन यांनी खोडून काढला. कुंभमेळ्याच्या सर्व कामांची यादी त्यांना दिली जाईल. महापालिकेची कामे २० ते २५ टक्के कमी दराने गेलेली आहेत. रस्ते दुरुस्तीचे कामही ३० ते ३५ टक्के कमी दराने, तर फायबर ऑप्टिकचे काम ४२ टक्के कमी दराने दिले गेले. मग यात भ्रष्टाचार कसा असेल?’ असा प्रश्न त्यांनी केला. या प्रक्रियेत पारदर्शकता राखली जात आहे. अपुऱ्या माहितीवर अथवा राजकीय स्वरूपाची विधाने त्यांच्याकडून झाली. त्यांनी आधी माहिती जाणून घेणे गरजेचे होते. कुठलेही काम अधिक दराने दिले किंवा एखादी निविदा ‘मॅनेज’ करून दिली हे राज ठाकरे यांनी सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान मंत्री महाजन यांनी दिले.

कुंभमेळा सर्वांसाठी आस्थेचा विषय असून कामाच्या दर्जाबाबत कुठेही तडजोड केली जाणार नाही. त्यामुळे निविदा ‘मॅनेज’ झाली किंवा बाहेरच्या ठेकेदाराला काम दिले असे कुठेही झाले नसल्याचा दावा महाजन यांनी केला.

मनसे पराभूत का झाली?

मनसेची सत्ता असताना नाशिक सुंदर बनवले होते, या राज ठाकरे यांच्या विधानावरून गिरीश महाजन यांनी त्यांना टोला हाणला. मनसेच्या सत्ताकाळात नाशिक तुम्ही एवढे सुंदर केले होते, तर लोकांनी तुम्हाला निवडून का दिले नाही, महापालिका निवडणुकीत मनसे का पराभूत झाली असा प्रश्न महाजन यांनी केला. मनसेने नाशिकमध्ये काहीही केले नाही. राज ठाकरे यांनी केवळ गप्पा मारल्या. चांगले काम केले असते, तर मनसेचे काही नगरसेवक तरी निवडून आले असते, असे महाजन यांनी नमूद केले.