जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला अनुपस्थित राहिल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी “ते मोठे लोक आहेत, मी उकिरड्यावरून आलोय…”, असे एक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या एका वक्तव्याने राजकीय चर्चेला नवे वळण मिळाले असून खडसेंना शुभेच्छा देणाऱ्या भाजप नेत्यांवरच त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे
एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे यांच्यासह गिरीश महाजन आणि अनेक मंत्री, आमदार व मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, अपेक्षेप्रमाणे महायुतीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती या कार्यक्रमात दिसली नाही. त्यात खडसे यांचे माजी राजकीय सहकारी असलेल्या गिरीश महाजन यांची अनुपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली.
महाजन भाजप नेत्यांवर नाराज का?
दरम्यान खडसे यांना भाजपच्या मोठ्या नेत्यांकडून मिळालेल्या शुभेच्छांबाबत जळगावात पत्रकारांकडून विचारण्यात आले असता, गिरीश महाजन यांनी “ते मोठे लोक आहेत, मी उकिरड्यावरून आलोय…” अशी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. वरकरणी त्यांचे स्वतःबद्दल आत्मउपहासात्मक भाष्य वाटत असले तरी, या वक्तव्याचा राजकीय संदर्भ वेगळा असल्याची चर्चा जळगावच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला देश आणि राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. त्याच पार्श्वभूमीवर महाजन यांनी ‘ते मोठे लोक’ असा उल्लेख करत स्वतःला ‘उकिरड्यावरून आलेला’ असल्याचे म्हटले. त्यामुळे या वक्तव्यामागे नेमका कोणता राजकीय टोला दडला आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.
खडसे-महाजन संघर्षाची जुनी पार्श्वभूमी
गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असताना दीर्घकाळ एकत्र काम करणारे नेते होते. जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात दोघांचेही स्वतंत्र वजन राहिले आहे. मात्र, कालांतराने दोघांमधील राजकीय मतभेद वाढत गेले. खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर हा संघर्ष अधिक तीव्र झाला. त्यानंतर विविध राजकीय प्रसंगांमध्ये दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यासारख्या प्रसंगी दोन्ही नेते एकत्र येणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, महाजन यांच्या अनुपस्थितीनंतर त्यांच्या “उकिरड्यावरून आलोय” या वक्तव्याने पुन्हा जुन्या राजकीय संघर्षाला हवा मिळाली आहे.
वक्तव्याचा नेमका राजकीय अर्थ काय?
महाजन यांच्या वक्तव्याचा थेट अर्थ त्यांनी स्पष्ट केलेला नसला, तरी त्यातून स्वतःच्या राजकीय प्रवासाबद्दल उपरोध व्यक्त करताना खडसेना शुभेच्छा देणाऱ्या भाजप नेत्यांना त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेषतः खडसे यांना शुभेच्छा देणाऱ्या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी केलेली ही टिप्पणी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. खडसे यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याच्या चर्चेपेक्षा महाजन यांच्या एका वाक्यानेच राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे “ते मोठे लोक आहेत, मी उकिरड्यावरून आलोय…” हे विधान सध्या जळगावच्या राजकारणातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे. महाजन यांच्या या वक्तव्याचा पुढील राजकीय परिणाम काय होतो, याकडे जळगावच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
