नाशिक – उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत् हे नेहमीच चर्चेत असतात. केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर ते वेगवेगळ्या कारणांमुळे सतत टीका करत असतात. त्याप्रमाणे सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री, आमदार, नेतेही खासदार राऊत यांच्या टिकेला उत्तर देत असतात. नाशिकचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हेही खासदार राऊत यांच्या टिकेला कधी उपरोधिकपणे तर कधी मिश्किलपणे उत्तर देत असतात. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री गिरीश महाजन यांनी खासदार संजय राऊत यांच्याविषयी केलेले विधान विशेष गाजत आहे.
गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात डीजे वाजविण्यावरुन निर्माण होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात अनेक नागरिक पुढे येऊ लागले आहेत. त्यांच्या या भूमिकेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विरोध होत असल्याचेही दिसत आहे. गणेशोत्सवात डीजे वाजविण्यास काही शहरांमध्ये तेथील पोलीस आयुक्तांनी बंदी घातली आहे. काही शहरांमध्ये काही निर्बध घालण्यात आले आहेत. यासंदर्भात नाशिक येथे पत्रकारांशी मंत्री महाजन यांनी संवाद साधताना आपली भूमिका मांडली. न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे आणि आवाजांच्या मर्यदांचे पालन करुन डीजे वाजविण्यास हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले. ध्वनीप्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होत असल्याची वस्तुस्थिती असल्याचे सांगतानाचरी सण आणि उत्सव यांचेही महत्व असल्याचे त्यांनी मांडले. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. वृद्ध, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांना मोठ्या प्रमाणावरील आवाजामुळे त्रास होणार नाही, याची काळजी सार्वजनिक गणेश मंडळांनी आणि कार्यकर्त्यांनी घेण्याची गरजही मंत्री महाजन यांनी मांडली.
यावेळी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासंदर्भातील एका विषयावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना राऊत यांना जेलमध्ये असताना काय झाले, याची आपणास माहिती नसल्याचे सांगितले. संजय राऊत यांना कुठला आजार झाला, याविषयी माहिती नाही. परंतु, त्यांनी स्वत:च्या सर्व अवयवांची तपासणी करुन घ्यावी. त्यांची इच्छा असल्यास आणि गरज असल्यास सरकारच्या वतीनेही वैद्यकीय तपासणी करु, असे मंत्री महाजन यांनी सांगितले. तसेच काँग्रेसचे नेते राहुल गाधी, उध्दव ठाकरे यांना कोणताही जनाधार राहिलेला नसल्याने ते आंदोलनांच्या माध्यमातून राजकारण करत आहेत, असा आरोपही मंत्री महाजन यांनी केला. उध्दव ठाकरे यांच्या पक्षात आता कोण उरले आहे, असा प्रश्नही मंत्री गिरीश महाजन यांनी केला.
