जळगाव : जंतर-मंतर येथे तरुणांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार टीका केली आहे. काही लोक आयत्या बिळात नागोबा आणि बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना सारखे असतात. बँड वाजला की नाचायला निघतात. लग्न कुणाचे आहे, याच्याशी त्यांचा काहीही संबंध नसतो. सध्या ठाकरे बंधूंचीही अशीच अवस्था झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जळगाव जिल्ह्यात सोमवारी पत्रकारांशी बोलताना भाजप नेते तथा मंत्री महाजन यांनी विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आंदोलनाच्या राजकारणावर भाष्य केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंदोलने करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी आणि राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी विरोधकांकडून अशा प्रकारच्या आंदोलनांना पाठिंबा दिला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

महाजन म्हणाले की, जंतर-मंतरवरील आंदोलनामुळे उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांना कोणताही राजकीय फायदा होणार नाही. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांना खरोखरच आस्था असती, तर सत्तेत असताना त्यांनी ठोस निर्णय घेतले असते. मात्र, आज सत्तेबाहेर गेल्यानंतर विद्यार्थ्यांच्या नावाने आंदोलन करून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न जनतेच्या लक्षात आला असून त्यातून कोणतेही राजकीय यश मिळणार नाही, असा दावा त्यांनी केला.

टीईटी घोटाळ्यावेळी आंदोलन का नाही?

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठा टीईटी परीक्षा घोटाळा समोर आला होता. त्या वेळी लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य पणाला लागले होते. मात्र, त्या काळात विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्याची किंवा आंदोलने करण्याची आठवण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला झाली नव्हती, असा आरोपही मंत्री गिरीश महाजन यांनी केला. आज त्याच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर भूमिका घेत असल्याचे दाखविले जात आहे. ही भूमिका राजकीय सोयीची असून त्यामागे विद्यार्थ्यांचे हित नसल्याची टीकाही त्यांनी केली.

आपला पक्ष वाचविण्याकडे लक्ष द्यावे

गिरीश महाजन यांनी ठाकरे बंधूंना पक्ष संघटना मजबूत करण्याचा सल्लाही दिला. आज त्यांच्या पक्षातील आमदार, माजी आमदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर पक्ष सोडत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत आंदोलने करण्यापेक्षा स्वतःचा पक्ष कसा मजबूत होईल, पक्षातील लोक कसे टिकून राहतील आणि संघटना कशी वाढेल, यावर त्यांनी लक्ष केंद्रित करायला हवे,” असे ते म्हणाले. जनतेचा पाठिंबा कमी होत असल्याची जाणीव झाल्यामुळेच विरोधी पक्ष विविध आंदोलनांमध्ये सहभागी होत आहेत. मात्र, अशा प्रकारे प्रत्येक आंदोलनात सहभागी होऊन राजकीय पुनरुज्जीवन साध्य होणार नाही. जनतेचा विश्वास मिळवायचा असेल तर सातत्याने काम करावे लागते, केवळ आंदोलनांमध्ये उपस्थिती लावून तो मिळत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

जनाधार कमी झाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा आधार

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मागे पूर्वीइतका जनाधार उरलेला नसल्याची जाणीव त्यांना झाली आहे. त्यामुळेच विद्यार्थी आणि तरुणांच्या प्रश्नांचा आधार घेऊन पुन्हा राजकीय अवकाश निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप महाजन यांनी केला. मात्र, महाराष्ट्रातील जनता सर्व परिस्थिती पाहत असून अशा भूमिकेमुळे त्यांना कोणताही राजकीय लाभ होणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. दरम्यान, महाजन यांच्या या टीकेमुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय आरोप-प्रत्यारोप पुन्हा तीव्र झाले असून, जंतर-मंतर आंदोलनाच्या निमित्ताने राज्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.