​नाशिक – दिंडोरी येथे नऊ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली विहीर तातडीने बुजविण्याचे निर्देश नगरपालिकेला दिले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल. मृतांच्या कुटुंबांना पाच लाख रुपयांची मदत करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

​दिंडोरी येथे रात्री विहिरीत मोटार कोसळून सहा शालेय विद्यार्थ्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर मंत्री महाजन यांनी शनिवारी सकाळी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. ​त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. नऊ जणांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. ही विहीर रस्त्याच्या मधोमध येत असतानाही तिच्या संरक्षणासाठी कोणताही मजबूत कठडा नव्हता. तसेच धोक्याची सूचना देणाऱ्या फलकाचाही अभाव होता. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे महाजन यांनी स्पष्ट केले. प्रथमदर्शनी दोषी असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित धोकादायक विहीर तात्काळ बुजविण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. दिवसभरात विहीर बुजविण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे सूचित करण्यात आले आहे.

​या घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार चौकशी करून ते अहवाल सादर करतील. या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला असून त्यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

​अपघातानंतर जाग…

​दिंडोरीतील शिवाजीनगर भागातील रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या या धोकादायक विहिरीला सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षक कठडा आणि आच्छादन करावे, अशी मागणी स्थानिकांकडून मागील पाच ते सहा वर्षांपासून केली जात होती. या विहिरीत पाळीव जनावरे पडल्याच्या घटना घडल्या होत्या. दिंडोरी नगर परिषद आणि जागामालकाच्या दुर्लक्षामुळे ही भीषण दुर्घटना घडल्याचा आरोप मृतांचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी केला. या घटनेनंतर युद्धपातळीवर विहीर बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. मालमोटारीद्वारे माती, राडारोडा टाकून ती बुजविण्यास सुरुवात झाली. नगरपंचायतीने विहीर बुजविण्याचे काम हाती घेतले असले तरी नागरिकांचा संताप कायम आहे. हे काम आधीच केले असते, तर नऊ जणांना जीव गमवावा लागला नसता, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.