मालेगाव : भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व भाजपचे संकटमोचक नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे सभा पार पडली. यावेळी बोलतान गिरीश महाजन यांनी मोठे विधान केले आहे. पक्ष कार्यकर्त्यांनी सर्व हेवेदावे व मतभेद बाजूला ठेवून एक दिलाने काम केल्यास आश्चर्यकारक निकाल लागतील व मालेगावात भाजपचा महापौर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीतील धुळे मतदार संघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचा निसटता पराभव झाला होता. काँग्रेस उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना मालेगावातून एकतर्फी व भरभरून मते मिळाल्याने भाजपवर पराभवाची ही नामुष्की ओढवली होती. हा धागा पकडत लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्याची हीच वेळ असल्याचे नमूद करत कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा उत्साह फुंकण्याचा प्रयत्न चव्हाण व महाजन यांनी यावेळी बोलताना केला.
स्वबळाचा नारा का ?
मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी भाजप व शिवसेना शिंदे गटात युती करण्यासंदर्भात बोलणी सुरू होती. मात्र अखेरच्या क्षणी ही युती फिस्कटली. ही युती का होऊ शकले नाही, याचे स्पष्टीकरण महाजन यांनी सभेत दिले. युतीबाबत प्रारंभी सकारात्मक चर्चा झाली, मात्र जागा वाटपावर अपेक्षित तोडगा न निघाल्याने भाजपने २६ जागा स्वबळावर आणि कमळ चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेतला. यानिमित्ताने पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवारी करण्याची अधिकाधिक संधी प्राप्त झाली आहे. तेव्हा कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद बाजूला सारून या निवडणुकीत एकदिलाने काम करावे. जर,तसे झाले तर निकाल आश्चर्यकारक लागतील असा विश्वास महाजन यांनी बोलून दाखवला.
चार मुस्लिमांना उमेदवारी
भाजप हा सर्वसमावेशक असा पक्ष असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी यावेळी बोलताना केला. त्यामुळेच २६ पैकी मुस्लिम समाजातील चार लोकांना पक्षाने उमेदवारी दिली असल्याचे सांगत ‘सबका साथ, सबका विकास’ या भाजपच्या भूमिकेवर चव्हाण यांनी भर दिला. भाजप सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे,मालेगावात भाजपने दिलेले ४ मुस्लिम उमेदवार सत्तेसाठी नाही, तर मालेगावातील जनतेच्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी लढत आहेत. त्यामुळे मतदारांनी कमळ चिन्हा समोरील बटण दाबून विकासाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.
सरकारी योजनांचा उल्लेख
चव्हाण व महाजन या दोन्ही नेत्यांनी केंद्र व राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा आपल्या भाषणांमध्ये उल्लेख केला. मोदी-फडणवीस सरकारने उज्ज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना, मोफत रेशन आणि आयुष्मान भारत या माध्यमातून गरिबांना आधार दिला आहे. लाडकी बहीण योजना आणि एसटी प्रवासात ५०% मिळणाऱ्या सवलतीमुळे महिलांचे सक्षमीकरण होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे यांनी केले, तर आभार सुनील गायकवाड यांनी मानले. व्यासपीठावर प्रदेश महामंत्री विजय चौधरी, दादा जाधव, बंडूकाका बच्छाव, अद्वय हिरे, तुषार शेवाळे, कमलेश निकम यांच्यसह सर्व २६ उमेदवार तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
