जळगाव : राजकीय समीकरणे बदलतात, पक्ष बदलतात मात्र राजकारणातील काही आठवणी कायम स्मरणात राहतात. भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी अशीच एक जुनी आठवण सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्याविषयीचा एक किस्सा उलगडला. आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना महाजन यांनी उपोषणादरम्यान देवकर यांनी आपल्याकडे तेव्हा आपल्याकडे साधे ढुंकूनही पाहिले नव्हते, असे सांगत त्यांनी मनातील शल्य सगळ्यांसमोर बोलून दाखवले.
राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील अटी शिथिल करण्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः आंदोलनस्थळी भेट दिली. सरकारच्या वतीने पावसाळी अधिवेशनापूर्वी मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर रोहित पवार यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. दरम्यान, आंदोलनस्थळी उपस्थितांशी संवाद साधताना महाजन यांनी स्वतःच्या राजकीय जीवनातील संघर्षाच्या दिवसांची जुनी आठवण सांगितली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, याचा संदर्भ देताना त्यांनी जळगावमधील आपल्या ऐतिहासिक उपोषणाचा उल्लेख केला.
कापसासाठी ११ दिवसांचे उपोषण
गिरीश महाजन म्हणाले की, काही वर्षांपूर्वी जळगावमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल सहा हजार रुपयांचा भाव मिळावा, या मागणीसाठी त्यांनी सलग ११ दिवसांचे उपोषण केले होते. त्या काळात राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेवर होते, तर जळगावचे गुलाबराव देवकर राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्यरत होते. “मी ज्या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो, त्या ठिकाणापासून देवकर यांचे घर अवघ्या ५०० फुटांच्या अंतरावर होते. ते दररोज त्या रस्त्याने ये-जा करायचे. मला वाटायचे की एखाद्या दिवशी ते भेटायला येतील, विचारपूस करतील किंवा उपोषण सोडविण्यासाठी प्रयत्न करतील. पण त्यांनी एकदाही माझ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही,” असे महाजन यांनी सांगितले.
निरोपही पाठवला, उपयोग झाला नाही
उपोषणाच्या पाचव्या-सातव्या दिवशी मी स्वतः गुलाबराव देवकर यांना निरोप देऊन त्यांच्याकडे कार्यकर्त्यांनाही पाठवले. म्हटले तुमचे आणि माझे चांगले संबंध आहेत, माझे उपोषण तर सोडा. काही आश्वासन तर द्या. वरती काहीतरी बोला. परंतु, त्यांनी स्पष्टच सांगितले की मला वरुन सूचना आहेत की तिकडे अजिबात बघायचे नाही. गिरीश महाजन यांना जितके दिवस उपोषणाला बसायचे आहे, तितके दिवस बसू द्या. आता सांगायला हरकत नाही, की अजितदादांचा तेव्हा देवकरांना स्पष्टच आदेश होता की तिकडे बघायचे सुद्धा नाही, असा किस्सा मंत्री महाजन यांनी उपोषणस्थळी सांगून वातावरण हलकेफुलके केले.
राजकीय विरोधक आता महायुतीत
विशेष म्हणजे, एकेकाळी राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन आणि गुलाबराव देवकर आज महायुतीत एकत्र काम करत आहेत. देवकर यांनी अलिकडेच शरद पवार गटातून अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे महाजन यांनी सांगितलेल्या या आठवणींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत विरोधक मित्र झाले असले, तरी संघर्षाच्या काळातील अनुभव आणि आठवणी आजही त्यांच्या स्मरणात कायम असल्याचे या प्रसंगातून स्पष्ट झाले. महाजन यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून, जुन्या राजकीय संघर्षांची आणि बदलत्या सत्तासमीकरणांची पुन्हा एकदा आठवण झाली आहे.
