जळगाव: शहरातील महापालिकेच्या निवडणुकीत गेल्या वेळी भाजप स्वबळावर लढली होती. मात्र, यावेळी भाजसपसह शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांची महायुती मैदानात उतरली आहे. या पार्श्वभूमीवर, भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी मोठे वक्तव्य प्रचार नारळ फोडताना केले आहे.
मागील महापालिका निवडणुकीत जळगाव महापालिकेच्या ५७ जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवला होता. मात्र, निवडणुकीनंतर काही नगरसेवकांनी ऐनवेळी पक्ष सोडल्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या विकासात्मक प्रयत्नांना मोठी खीळ बसल्याची कबुली मंत्री गिरीश महाजन यांनी आता दिली आहे. त्यासोबतच गेल्या सात वर्षांच्या कालावधीत होऊ न शकलेला विकास यापुढील दोन वर्षांत केला जाईल. राज्य व केंद्र सरकारमध्ये महायुतीचे सरकार असल्यामुळे जळगाव शहराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. गेल्या कार्यकाळात राजकीय अडथळ्यांमुळे विकास कामांचा वेग अपेक्षेप्रमाणे राहिला नसला, तरी आगामी काळात त्याची भरपाई करण्यात येईल. जळगावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजना थेट महापालिकेपर्यंत पोहोचवण्यात येतील, असेही मंत्री महाजन यांनी म्हटले आहे.
जळगावमध्ये कमी थांबण्याचे कारण…
दरम्यान, जळगाव महापालिकेवर निर्विवाद बहुमत मिळविण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटासह शिवसेना ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील बऱ्याच पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून यापूर्वी जिंकलेल्या प्रभागात भाजपची विजयाकडे वाटचाल सुकर होईल. त्यामुळे आपल्याला जळगावची अजिबात चिंता नाही. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून मी मोजून दोनच वेळा जळगावमध्ये आलो आहे. यापुढेही जळगावमध्ये माझी उपस्थिती कमीच असेल. शक्यतो मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मी नाशिकमध्ये जास्तकरून थांबणार आहे. माझ्याकडे जळगावसह नाशिक, धुळे, मालेगाव आणि अहिल्यानगर या महापालिकांच्या जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जळगावपेक्षाही महाजन यांचे विशेषतः नाशिक महापालिकेकडे जास्त लक्ष असल्याचे दिसून आले.
भाजपचे ‘कमकुवत’ जागांवर लक्ष?
नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील तिकीट वाटपावरून सुरू असलेल्या नाराजी नाट्यावरही संकटमोचक नेते गिरीश महाजन यांनी मौन सोडले आहे. १२२ जागांसाठी तब्बल १२०० इच्छुक रिंगणात असल्याने उमेदवारीचा पेच सोडवणे हे आमच्यासाठी मोठे आव्हान होते, अशी कबुली त्यांनी दिली. उमेदवारी न मिळाल्याने भाजपमधील अनेक निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले आहेत. यावर भाष्य करताना महाजन म्हणाले की, पक्षाने केवळ वैयक्तिक आवडी निवडीवर नव्हे, तर विशिष्ट निकषांच्या आधारावरच उमेदवारी निश्चित केली आहे. बाहेरून आलेल्या नेत्यांना उमेदवारी का दिली? या प्रश्नावर महाजन यांनी पक्षाची रणनीती उघड केली. ज्या प्रभागांमध्ये किंवा जागांवर वर्षानुवर्षे भाजपचा उमेदवार निवडून येत नव्हता, अशा ठिकाणी आम्ही इतर पक्षांतून आलेल्या ताकदवान नेत्यांना संधी दिली आहे. या निर्णयामुळे पक्षाची ताकद वाढेल आणि विजयाचे समीकरण सोपे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
