जळगाव : भाजपचे माजी उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच, सोमवारी जळगावात वेगळेच चित्र पाहायला मिळाले. शहराजवळील खचलेल्या बायपास महामार्गाची पाहणी करण्यासाठी आलेले मंत्री गिरीश महाजन यांना पत्रकारांनी ऑडिओ क्लिप प्रकरणावर थेट प्रश्न विचारला. मात्र, महाजन यांनी कोणतीही सविस्तर प्रतिक्रिया देणे टाळत थेट पुढे चालत जाणे पसंत केले. परिणामी, “महाजन पुढे आणि पत्रकार मागे” असे नाट्यमय दृश्य पाहायला मिळाले.

विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर गिरीश महाजन हे पहिल्यांदाच जळगावात आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाबाबत प्रश्न विचारले. विशेषतः माजी खासदार डॉ. हिना गावित, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे आणि महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याविषयी झालेल्या कथित आक्षेपार्ह चर्चेवर त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, महाजन यांनी कोणत्याही प्रश्नाला थेट उत्तर न देता पुढे जाणेच पसंत केले.

पत्रकारांनी वारंवार प्रश्नांचा भडिमार सुरू ठेवला असताना महाजन यांनी केवळ “पक्षाने विजय चौधरी यांच्यावर कारवाई केली आहे,” एवढेच म्हटले. त्यानंतर त्यांनी अधिक काहीही भाष्य करण्यास नकार दिला. चौधरी हे महिला पदाधिकाऱ्यांबद्दल बोलत असताना आपण त्यांना थांबवले नाही किंवा समर्थन दिल्याचा विरोधकांचा आरोप आहे, याबाबत विचारणा केल्यावरही त्यांनी मौनच बाळगले. दरम्यान, विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे भाजप अडचणीत सापडला आहे. पहिल्या क्लिपमध्ये माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य झाल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांच्यातील कथित संभाषणाची आणखी एक ध्वनिफीत समोर आल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे. या क्लिपमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, त्यांचे सासरे आमदार एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्याविषयीही चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

या प्रकरणानंतर भाजपने विजय चौधरी यांचा तातडीने राजीनामा घेतला असला, तरी नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण अद्याप तापलेले आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून भाजपला लक्ष्य करत महाजन यांनी या कथित संभाषणादरम्यान चौधरी यांना रोखले नसल्याचा आरोप केला आहे. या सर्व घडामोडींमुळे जळगावातील बायपास महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावेळी विकासकामांपेक्षा ऑडिओ क्लिप प्रकरणाचीच अधिक चर्चा रंगली. पत्रकारांच्या प्रश्नांपासून दूर जाण्याचा महाजन यांचा प्रयत्न आणि त्यांच्या मागे उत्तरांच्या प्रतीक्षेत धावणारे पत्रकार हेच या दौऱ्याचे सर्वाधिक चर्चेचे दृश्य ठरले. आता या प्रकरणावर महाजन नव्याने सविस्तर भूमिका मांडणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.