जळगाव : जिल्ह्यातील भागपूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत जामनेर तालुक्यातील एकुलती येथे साठवण तलाव, तर पाचोरा तालुक्यातील गोलटेकडी (लोहारा) येथे लघु पाटबंधारे तलाव बांधण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेल्या अन्य कामांनाही मंजुरी मिळाली असून ८० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाकडून या कामांसाठी कार्यारंभ आदेशही पारित करण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
भागपूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत एकुलती येथे साठवण तलाव आणि गोलटेकडी (लोहारा) येथे लघु पाटबंधारे तलाव उभारण्यात येणार आहे. या कामांसाठी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून आता प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रस्तावित प्रकल्पांचा काही भाग वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तताही करण्यात आली आहे.
या प्रकल्पांमुळे परिसरात पाणीसाठा निर्माण होण्याबरोबरच शेतीसाठी उपलब्ध पाण्याचा अधिक प्रभावी वापर करता येणार आहे. पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. गोलटेकडी लघु पाटबंधारे प्रकल्पाची साठवण क्षमता ६.०० दशलक्ष घनमीटर असून, त्याद्वारे १,००३ हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच एकुलती साठवण तलावाची क्षमता १.७५६ दशलक्ष घनमीटर असून, त्यातून ३९२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अशा प्रकारे दोन्ही प्रकल्पांमधून एकूण १,३९५ हेक्टर शेतीला सिंचनाचा शाश्वत आधार मिळणार आहे.
कोरडवाहू शेतीला सिंचनाचा आधार
भागपूर योजनेच्या माध्यमातून जामनेर आणि पाचोरा तालुक्यातील सुमारे १,३९५ हेक्टर कोरडवाहू शेती क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याचा आधार मिळणार असून विविध पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे खरीप हंगामासोबतच रब्बी हंगामातील पिकांचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेतकऱ्यांना विविध पिकांचे नियोजन करता येणार असून, शेती अधिक उत्पादनक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल. सिंचन क्षेत्र वाढल्याचा सकारात्मक परिणाम स्थानिक कृषी अर्थव्यवस्थेवरही होण्याची अपेक्षा आहे.
दुष्काळमुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
जामनेर आणि पाचोरा तालुक्याला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी आणि सिंचन क्षमता वाढविण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. भागपूर उपसा जलसिंचन योजना हा त्याच प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग आहे. या योजनेच्या कामासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने निधी व आवश्यक मंजुऱ्या मिळाल्या आहेत. जामनेर आणि पाचोरा तालुक्यातील १,३९५ हेक्टर जमीन सिंचनाखाली आल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पाण्याअभावी शेती उत्पादनावर होणारा परिणाम कमी करून शेतकऱ्यांना स्थिर आणि शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. आगामी काळात जामनेरसह पाचोरा तालुके दुष्काळमुक्त करण्यासाठी आणखी प्रभावी प्रयत्न केले जातील, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
