जळगाव : गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत तसेच नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. त्यामुळे महाविकास आघाडीला महायुतीपुढे सपशेल शरणागती पत्करावी लागली. ही स्थिती लक्षात घेता महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी लाडक्या बहि‍णींसाठी मोठी घोषणा केली आहे.

राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेला राज्यातील महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळत असून, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महिलांमध्ये सरकारबद्दल सहानुभूती निर्माण करणे आणि महिला मतदारांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी देवाभाऊंकडून म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट मिळणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, येत्या १४ जानेवारीपूर्वी म्हणजेच मकर संक्रांतीच्या आधी राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे एकत्रित ३००० रुपये जमा करण्यात येणार आहेत.

मंत्री गिरीश महाजन यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत लाडकी बहीण योजनेची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे. मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना दिलासा देणारी ही मोठी भेट ठरेल, असे मंत्री महाजन यांनी आपल्या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये नमूद केले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या या आर्थिक मदतीमुळे अनेक महिलांना दैनंदिन खर्च, शिक्षण आणि आरोग्य विषयक गरजांसाठी आधार मिळतो. त्यामुळे मंत्री महाजन यांनी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना दिलासा देणारी मोठी घोषणा महायुती सरकारने केल्याचा दावा केला आहे.

मंत्री महाजन यांनी समाज माध्यमावर शेअर केलेल्या एका पोस्टरमुळे राज्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाजन यांनी शेअर केलेल्या पोस्टरमधील माहितीनुसार, येत्या १४ जानेवारीपूर्वी म्हणजेच मकर संक्रांतीच्या आधी राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे एकत्रित ३००० रुपये जमा होणार आहेत. राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ही रक्कम थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग केली जाणार असल्याचे म्हटले आहे.