नाशिक – राज्यात ज्या महापालिका निवडणुकीत आम्ही मित्रपक्षांच्या सोबतीने लढलो, तिथे त्यांना सत्तेत सोबत घेतले जात आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत आम्ही परस्परांविरोधात लढलो, भाजपला या ठिकाणी पूर्ण बहुमत असून कुठल्याही कुबड्यांची गरज नाही, असे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

नाशिक महापालिका निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाली होती. पालिकेतील १२२ पैकी ७२ जागा भाजपने स्वबळावर जिंकून पुन्हा एकहाती सत्ता मिळवली. विरोधात लढणाऱ्या शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) २६ आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) चार नगरसेवक निवडून आले. गतवेळी एकसंघ शिवसेनेला विरोधी पक्षात बसावे लागले होते. यावेळी त्याचीच पुनरावृत्ती झाली. या परिस्थितीत भाजपकडून विरोधात लढणाऱ्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला गोंजारण्याचे काम सुरू झाले.

केंद्र व राज्यात तिन्ही पक्ष सत्तेत एकत्र आहेत. त्यामुळे नाशिक महापालिकेतसुद्धा भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने एकत्र काम करावे, अशी भूमिका भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी मांडली होती. भाजपकडून प्रस्ताव आल्यास विचार केला जाईल असे शिंदे गटाकडून सांगितले गेले. या अनुषंगाने महायुतीतील मित्रपक्षांत पडद्याआड विचार विनिमय सुरू झाला, एखादे महत्वाचे पद शिंदे गटाला दिले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

या संदर्भात कुंभमेळामंत्री गिरिश महाजन यांच्याकडे पत्रकार परिषदेत विचारणा झाली असता त्यांनी नाशिकमध्ये आम्ही परस्परांविरोधात लढलो, त्यामुळे येथे मित्रपक्षांना सोबत घेण्याची गरज नसल्याचे सांगत या संदर्भातील चर्चांना पूर्णविराम दिला. तशी कुठलीही चर्चा झालेली नाही. तसा काही प्रस्ताव आलेला नाही. नाशिकमध्ये भाजपला कुबड्यांची गरज नाही. भाजपचे ७२ नगरसेवक निवडून आले असून त्याच्यात महत्वाची पदे वाटली जातील, असे संकेत त्यांनी दिले.

जळगावचा दाखला देत निवडणुकीत आम्ही एकत्र लढलो असतो तर तसा विचार झाला असता. जळगावमध्ये भाजपला १०० टक्के यश मिळाले. तर शिवसेनेचे २० नगरसेवक निवडून आले. तिथे एकत्रितपणे सत्ता स्थापन केली जाईल. मात्र, जिथे विरोधात लढलो आणि आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे, तिथे मित्रपक्षांना सोबत घेणे शक्य नसल्याचे मंत्री महाजन यांनी सूचित केले. नाशिकच्या महापौरपदाबाबत मुख्यमंत्री व वरिष्ठांशी चर्चा करून नाव ठरवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.