नाशिक – नाशिकमधील रस्त्यांच्या अवस्थेवरुन सातत्याने टीका सहन करावी लागत असलेले कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याबाबत केलेले विधान चर्चेत आले आहे. त्याचवेळी महाजन यांनी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावही टीका केली आहे. संजय राऊत काहीही बोलतात, असे त्यांनी म्हटले आहे.
नाशिक शहरातील खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे पाच महिन्यात पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी नाशिक येथे असलेले गिरीश महाजन यांनी रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे मृत्यू झालेल्या महिलेच्या घरी भेट देत कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले. यावेळी पत्रकारांशी महाजन यांनी संवाद साधला. मृत महिलेच्या वारसांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मिळण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. युध्दपातळीवर आता नाशिकमधील खड्डे बुजविण्यात येत आहेत.
पाऊस सुरु असल्यामुळे याआधी खड्डे बुजविण्याचे काम करता आले नाही. त्यामुळे नाशिककरांना त्रास झाला, ही वस्तूस्थिती असल्याचे महाजन यांनी नमूद केले. आता खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग देण्यात आला असून पाच ते सहा दिवसात नाशिकमध्ये एकही खड्डा दिसणार नाही, असा दावा गिरीश महाजन यांनी केला. नाशिकला देशातली सर्वात सुंदर शहर करण्याचा ध्यास असल्याचेही महाजन यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या विधानावर टीका केली. उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना करोना काळात टीव्हीवर लाइव्ह येत संदेश देत होते. त्यावेळी भाजपचे नेते उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करीत होते.
परंतु, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही लाइव्ह संदेश देत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली
“करोनात उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना ते कधी घराबाहेर पडले नाहीत. रुग्णालयात रुग्णांच्या भेटीला गेले नाहीत. गाडीच्या चालकालाही शेजारी बसू दिले नाही. स्वत: गाडी चालवत पंढरपूरला गेले होते. उध्दव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची तुलना होऊ शकते का,” असा प्रश्न महाजन यांनी केला. “संजय राऊत हे काहीही बोलतात”, असा टोलाही त्यांनी हाणला.
दरम्यान, नाशिकमधील खड्डे आणि रस्त्याच्या अवस्थेवरुन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या आरोपानंतर महाजन आणि भुजबळ यांच्यातील संबंध ताणले गेल्याची चर्चा सुरु झाली. शनिवारी नाशिक येथे अण्णा भाऊ साठे स्मारक लोकार्पण कार्यक्रमातही दोघांमध्ये कोणतीच बोलणी न झाल्याने त्यांच्यात अबोला असल्याचे म्हटले जाऊ लागले. भुजबळ यांनी तसे काहीही नसल्याचे स्पष्ट केले. पुतळ्यास हार घालायला जाताना गिरीश महाजन यांनी आपणास हात देऊन वर घेतले, असे भुजबळ यांनी नमूद केले.”कोणी भाषण करत असतो त्यावेळी आपण त्यांचे ऐकत असतो किंवा आपल्याला पुढे काय बोलायचं याचा विचार करत असतो, त्यामुळे असे काहीही नाही,” असे भुजबळ यांनी नमूद केले.
