जळगाव : भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांचे एका तरुणीबरोबरचे आक्षेपार्ह फोटो काही दिवसांपूर्वी समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या प्रकरणी जळगाव शहरातील सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने संशयित फेसबुक खातेधारकाला पुणे जिल्ह्यातून अटक केली आहे. संबंधिताचा मोबाइलही जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे मंत्री महाजन यांची बदनामी केल्याच्या प्रकरणात दाखल गुन्ह्याच्या तपासाला आता आणखी गती मिळणार आहे.
भरत बालाजी म्हस्के (वय ३४, रा. गोंदी खुर्द, ता. गेवराई, जि. बीड), असे संशयिताचे नाव आहे. त्याला इंदापूर (जि. पुणे) येथून ताब्यात घेतले आहे. संशयिताने वापरलेला सुमारे ३० हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. या प्रकरणी जळगावचे नगरसेवक अरविंद भगवान देशमुख यांनी १९ जून २०२६ रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, संशयित भरत बालाजी म्हस्के याने त्याच्या फेसबुक खात्यावर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत एका मुलीचा फोटो पोस्ट करून तो सोशल मीडियावर प्रसारित केला होता. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३५६ आणि ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ (सी) आणि ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक विश्लेषणातून संशयिताचा शोध
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा, पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत महाडीक, पोलीस नाईक सचिन सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल निखिल नारखेडे तसेच शासकीय वाहन चालक सुधीर भंडारे यांचा समावेश होता. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा माग काढत इंदापूर येथे त्याचा शोध घेतला. त्यानंतर शिताफीने कारवाई करून त्याला ताब्यात घेऊ पुढील चौकशीसाठी जळगाव सायबर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले.
संशयिताकडून गुन्ह्याची कबुली
चौकशीदरम्यान संशयिताने संबंधित पोस्ट स्वतः टाकल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाईल जप्त करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम ३५ (३) अन्वये नोटीस बजावली असून, तपास पूर्ण करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले आहे. संशयिताने फेसबुकवर केलेली संबंधित पोस्ट यापूर्वीच ‘सहयोग’ पोर्टलच्या माध्यमातून हटविण्यात आली होती. त्यानंतर पुढील कारवाई करत १९ जुलै २०२६ रोजी संशयिताचे सुमारे ६ हजार फॉलोअर्स असलेले फेसबुक खातेही सहयोग पोर्टलद्वारे कायमस्वरूपी निलंबित करण्यात आले असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली.
