स्वातंत्र्यलढय़ातील नाशिकच्या योगदानाचे गुणगान ; मुख्य ध्वजवंदन सोहळा

कलेक्टर जॅक्सनची विजयानंद नाटय़गृहात हत्या करणारे हुतात्मा अनंत कान्हेरे नाशिकच्या क्रांतिकारकांच्या इतिहासातील महत्त्वाचे क्रांतिकारक आहेत.

स्वातंत्र्यलढय़ातील नाशिकच्या योगदानाचे गुणगान ; मुख्य ध्वजवंदन सोहळा
नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मुख्य ध्वजवंदन सोहळय़ात पुरस्कारार्थीचा गौरव करताना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन. समवेत आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे आदी.

नाशिक : शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयात भारतीय स्वातंत्र्यांच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजवंदन सोहळा झाला. या सोहळय़ात ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात असलेल्या नाशिकच्या योगदानाचे गुणगान केले.

देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात विविध संस्थांच्या दृश्य, अदृश्य स्वरूपातून अनेक चळवळींचा जन्म झाला. या चळवळींचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध नाशिककरांशी आल्याने त्यांनीही यामध्ये आपला सहभाग नोंदवला असल्याचे महाजन यांनी सांगितले. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी शस्त्र हातात धरण्याशिवाय पर्याय नाही हे ठासून सांगणारे वि. दा. सावरकर हे नाशिकचे भूषण आहेत. कलेक्टर जॅक्सनची विजयानंद नाटय़गृहात हत्या करणारे हुतात्मा अनंत कान्हेरे नाशिकच्या क्रांतिकारकांच्या इतिहासातील महत्त्वाचे क्रांतिकारक आहेत. प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्याचा ध्वज फडकविण्यात हुतात्मा कान्हेरेंचा मोलाचा वाटा आहे. आज आपण जी हर घर तिरंगा मोहीम अभिमानाने राबवित आहोत, या मोहिमेला हुतात्मा अनंत कान्हेरेंच्या इतिहासाची अमृतगाथा लाभली असल्याचे महाजन यांनी सांगितले. ब्रिटिश राजसत्तेला हादरे देणारे, त्यांना सळो की पळो करून सोडणारे क्रांतिकारी तात्या टोपे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील येवल्याचा. तात्या टोपेंच्या जन्मभूमीत येवला येथे त्यांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी केंद्र सरकारने १० कोटी ९० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला असून, येवला तालुक्यातील बाभुळगांव येथे साडेतीन हेक्टर जागेवर हे स्मारक उभारण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे महाजन यांनी सांगितले.

नाशिकच्या जनतेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी पूर्णपणे झोकून दिले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा अनंत कान्हेरे, तात्या टोपे यासारख्या क्रांतिकारी विभूतींच्या रूपाने इतिहासाने याची नोंद ठेवली आहे. अभिनव भारतासारख्या क्रांतिकारी संघटनांचा उदय आणि विकास नाशिक परिसरात झाल्याने नाशिक एक क्रांतिकारकांचे केंद्र म्हणून नावारूपास आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध संस्था, जिल्हा परिषद, पोलीस विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी १५ ऑगस्ट ते दोन ऑक्टोबर २०२२ या कालावधीत महाराष्ट्र नवउद्यम आणि नावीन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचे उद्घाटन महाजन यांनी हिरवा झेंडा दाखवून केले.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Girish mahajan praised the contribution of nashik in country s freedom struggle zws

Next Story
संततधारेने खड्डेमय शहराचे रूप पालटेना ; बुजविलेल्या खड्डय़ांवर पुन्हा मलमपट्टी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी