नाशिक : खड्डेमय नाशिकवरून सत्ताधारी मंत्री, मित्रपक्ष आणि विरोधकांकडून टिकेची झोड उठल्यानंतर कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने नाशिकला धाव घेतली. शनिवारपासून खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात केली जाणार असून आठवडाभरात हा प्रश्न सोडविला जाईल. खड्डे बुजविण्यासाठी मुरूमाऐवजी वेगळ्या पद्धतीने टिकाऊ काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कुंभमेळ्यासाठी प्रमुख रस्त्यांची एकाचवेळी हाती घेतलेली कामे, खोदकाम, रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, तात्पुरत्या मलमपट्टीमुळे चिखलमय स्थिती यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून आतापर्यंत चार वाहनचालकांचा मृत्यू झाला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गट, मनसे या विरोधी पक्षांसह शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या मित्रपक्षांकडूनही टीका होत आहे. प्रशासकीय यंत्रणांसह कुंभमेळामंत्री महाजन हे देखील लक्ष्य झाले. खड्ड्यांवरून उसळलेला जनक्षोभ लक्षात घेत कुंभमेळामंत्री महाजन यांनी नाशिकमध्ये दाखल होत महानगरपालिकेत बैठक घेतली.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कॅबिनेट बैठकीनंतर तीन दिवस नाशिकमध्ये मुक्काम करून रस्ते दुरुस्तीच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवणार असल्याचे सांगितले. नवीन उपाययोजना शनिवारपासून अंमलात आणल्या जातील. शहरात कुठेही खड्डे राहणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी आणि नवीन कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शनिवारी ठेकेदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. डांबर दराचा विषय, स्टाररेट आणि आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रियेत कालापव्यय झाला. आठवडाभरात खड्ड्यांचा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
हयगय करणाऱ्यांवर कारवाई
शासकीय अधिकारी महापौर आणि आमदारांनाही जुमानत नसल्याच्या प्रश्नावर मंत्री महाजन यांनी या संदर्भात तक्रार आल्यास हयगय करणाऱ्यवरां कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. मित्रपक्ष आणि इतर पक्षांच्या आंदोलनावर, राजकीय पक्षांना लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार असल्याचे सांगितले. शिंदे गटाचे मैत्रीपूर्ण आंदोलन असल्याचे त्यांनी नमूद केले.
मृतांच्या कुटुंबांना पाच लाखांची मदत
खड्ड्यामुळे अपघातात मृत्यू झालेल्या नीलेश कोतकर कुटुंबाची मंत्री महाजन यांनी सांत्वनपर भेट घेतली. कोतकर यांच्या मुलीच्या शिक्षणाची आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी सरकार घेईल. कोतकर यांची पत्नी शिक्षित असल्याने त्यांना नोकरी देण्याची जबाबदारी घेतली जाणार आहे. खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या माजी सैनिकाच्या कुटुंबियांना विशेष प्रकरणात १० लाख रुपयांची मदत केली जात आहे. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाती मयतांच्या कुटुंबांना नियमानुसार पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल, असे महाजन यांनी सांगितले.
