जळगाव : माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी प्रथमच त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. पाटील यांच्या संभाव्य पक्ष प्रवेशाबाबत बोलताना महाजन यांनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यामुळे आगामी काळात महाजन-पाटील यांच्यातील शाब्दिक युद्ध आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उन्मेश पाटील यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करुन त्यांचे मित्र करण पाटील यांना जळगाव मतदारसंघाची उमेदवारी मिळवून दिली होती. तसेच मित्राच्या प्रचारासाठी जीवाचे रान केले होते. प्रत्यक्षात, भाजप उमेदवार स्मिता वाघ विजयी झाल्या. या दरम्यान, पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर जाहीर सभांमधून जोरदार टीका केली. प्रचार आघाडीवरही भाजपच्या नाकात दम आणण्यात उन्मेश पाटील यांना यश आले होते.
या सर्व घडामोडीनंतर माध्यमांशी बोलताना भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले होते, की माजी खासदार उन्मेश पाटील यांना संसदीय मंडळाच्या निकषांत न बसल्यामुळे भाजपने लोकसभेची उमेदवारी नाकारली होती. मात्र, त्यांनी भाजपचा राजीनामा देऊन थेट शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. भाजपशी एकनिष्ठतेचा दाखला दिला असतानाही पाटील यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आणखी थोडी वाट बघायला हवी होती. भाजपमध्ये माजी खासदार पाटील आणि त्यांचे मित्र करण पाटील यांना दोघांना पुढे मोठे भवितव्य होते. मात्र, त्यांनी खूप घाई केली. आपण किती मोठी चूक केली हे त्यांना आगामी काळात कळेल, असा सूचक इशारा देखील गिरीश महाजन यांनी त्यावेळी दिला होता.
आता काय म्हणाले मंत्री महाजन?
दरम्यान, आता पुन्हा माजी खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटातून बाहेर पडत शिंदे गटात जाण्याच्या हालचाली सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना महाजन यांनी स्पष्ट केले आहे की, उन्मेश पाटील यांना आम्हीच पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. आणि त्यानंतर त्यांची राजकीय घसरण सर्वांसमोर आहे. भारतीय जनता पक्ष सोडल्यानंतर काय परिणाम भोगावे लागतात, याची जाणीव त्यांना आतापर्यंत झाली असेल, असाही टोला महाजन यांनी लगावला. पुढेही त्यांना आणखी पक्षांतर करावे लागू शकते, अशी शक्यता व्यक्त करत शिवसेना शिंदे गटातील माजी खासदार पाटील यांच्या प्रवेशाला आम्ही फारसे महत्त्व देत नसल्याचेही महाजन यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात पाटील विरुद्ध महाजन संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
