नाशिक – नाशिक महापालिकेत आम्हाला कुबड्यांची गरज नाही, असे ठणकावणारे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांना अवघ्या दोन दिवसांत एक पाऊल मागे घ्यावे लागले. केंद्र आणि राज्याप्रमाणे महापालिकेत महायुतीने एकत्रित काम करावे, असे वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या संदर्भात वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो मान्य केला जाईल, अशी भूमिका आता त्यांनी मांडली आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर ७२ जागा जिंकून बहुमत मिळवले. विरोधात लढणाऱ्या शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) २६ आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) चार नगरसेवक निवडून आले. निकालानंतर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मित्रपक्षांनी पालिकेत एकत्रित काम करण्याची भूमिका मांडली होती. यावर मंत्री महाजन यांनी अलीकडेच भाष्य केले होते.

नाशिकमध्ये आम्ही परस्परांविरोधात लढलो, त्यामुळे येथे मित्रपक्षांना बरोबर घेण्याची गरज नाही. या ठिकाणी भाजपला कुबड्यांची गरज नसल्याचे मंत्री महाजन यांनी सूचित करत मित्रपक्षांना सोबत घेण्याच्या विषयाला पूर्णविराम दिला होता. महाजन यांच्या विधानामुळे शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता पसरली. शिंदे गटाचे प्रवीण तिदमे, विलास शिंदे आणि राहुल दिवे यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले. भाजपकडून मच्छिंद सानप यांनी अर्ज भरला आहे. पालिकेत बहुमत असले तरी शिंदे गटाच्या उमेदवारीमुळे भाजपसाठी निवडणूक अटळ ठरल्याचे मानले जात आहे.

भाजपने मंगळवारी महापौर, उपमहापौरपदासाठी आपल्या उमेदवारांची नावे निश्चित केली. शिंदे गटाने उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केल्याच्या प्रश्नावर मंत्री महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाल्याचा दाखला दिला. स्थानिक नेत्यांनी अर्ज भरला असून त्यांच्याशीही बोलणे झाले. माघारीला अद्याप वेळ आहे, तोपयंत निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वरिष्ठ नेत्यांचे कुंभमेळा असल्याने केंद्र आणि राज्याप्रमाणे महापालिकेतही एकत्रित काम करावे, असे म्हणणे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. कुबड्यांची गरज नाही, या आपल्या विधानावर महाजन यांनी स्पष्टीकरण दिले.

नाशिकमध्ये भाजपकडे पुरेसे संख्याबळ आहे. अशी परिस्थिती नाही की, दुसऱ्यांना बरोबर घेतले नाही तर, आमचा महापौर बनणार नाही. आपल्या बोलण्याचा कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही, असा हेतू होता. मित्रपक्षाला बरोबर घेण्यासंदर्भात वरिष्ठ जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

उपमहापौर पदासाठी भाजप आणि शिंदे गटाने अर्ज दाखल केला आहे. भाजप उमेदवार माघार घेणार का, या प्रश्नावर त्यांनी आज काहीही सांगता येणार नाही, शिंदे गटाला समिती, अन्य पद की उपमहापौरपद द्यायचे हे अजून ठरलेले नाही. याविषयी वरिष्ठ एक ते दोन दिवसांत चर्चा करतील. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे महाजन यांनी सांगितले.