नाशिक – नाशिक महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून शुक्रवारी शिवसेना (उध्दव ठाकरे) आणि मनसे यांची हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात जाहीर प्रचार सभा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची प्रचार सभा त्याच मैदानावर झाली. या दोन सभानंतर रविवार हा सलग तिसरा दिवस मोठ्या जाहीर सभेचा ठरला.

रविवारी दुपारी नाशिक येथील गोदाघाट मैदानात भाजपची प्रचार सभा आयोजित करण्यात आली. या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, पंकजा मुंडे, देवयानी फरांदे यांची भाषणे झाली. या सभेत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करण्यासह तपोवनातील वृक्षतोडीसंदर्भात घेतलेल्या विरोधी भूमिकेवरुन डाव्या आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केले. तसेच नाशिकच्या गुन्हेगारीविषयीही मत मांडले.

तपोवनातील वृक्षतोड हा विषय महापालिका निवडणुकीत चर्चेचा विषय ठरत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनात साधू, महंत यांना निवासासाठी साधुग्राम उभारण्यात येणार आहे. या साधुग्रामसाठी तपोवनातील सुमारे १८०० झाडे तोडण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमींकडून या वृक्षतोडीस विरोध करण्यात येत आहे. तसेच भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनीही तपोवनातील वृक्षतोडीस विरोध केला आहे. विशेष म्हणजे, भाजपचे सत्तेत मित्रपक्ष असलेले शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) हे पक्षही या विषयावरुन विरोधात गेले आहेत. तपोवनाचा विषय नाशिक येथील जाहीर सभेत राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांनीही मांडला. ठाकरे बंधूंनी केलेल्या आरोपांना रविवारी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत उत्तर दिले.

तपोवनातील काही झाडेझुडपे तोडावी लागणार आहेत. परंतु, काही वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमींनी विरोध केला. डाव्या विचारसरणीच्या लोकांनीही विरोध सुरु केला. परंतु, आम्ही नाशिक शहरात २० हजारपेक्षा अधिक झाडे लावणार आहोत, असे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राज ठाकरे हे काहीही बोलतात, अशी टीका केली. नाशिकमध्ये काही महिन्यांपूर्वी गुन्हेगारी वाढली होती. विनयभंग केले जात होते. लुटमार केली जात होती. चाकू, कोयते बाहेर निघत होते, असेही महाजन यांनी सांगितले. परंतु, हे सांगताना गिरीश महाजन हे विसरले की, मागील अडीच वर्षांपासून गृहमंत्रीपद हे त्यांच्याच पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. म्हणजेच फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद असतानाच नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढल्याचे एकप्रकारे त्यांनी मान्य केले.

मागील काही महिन्यात नाशिकमधील गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना आदेश दिले. काहीही झाले तरी गुन्हेगारी मिटविण्याचे आदेश दिल्यावर पोलिसांनी तिसरा डोळा उघडला. आणि गुन्हेगारी नियंत्रणात आली. अनेक गुन्हेगार पोलिसांच्या धाकाने नाशिकमधून बाहेर पळाले. ते आता देवदर्शन करीत फिरत आहेत. तिथून फोन करुन विचारतात, “येऊ का ?, येऊ का ?” आता कशाला येतात, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. नाशिकमध्ये आता गुन्हेगार परत डोके वर काढणार नाहीत, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.
गोदाघाट मैदानावर झालेल्या या सभेस मोठ्या प्रमाणावर नाशिककरांनी गर्दी केली होती.