जळगाव : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच भाजपामधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. नंदुरबारमध्ये भाजपाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने पक्षातीलच माजी खासदारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा वाद शांत झालेला नसतानाच, आता आणखी एका कथित संभाषणाची क्लिप समोर आली आहे. या नव्या ध्वनिफितीमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले असून विरोधकांनी भाजपावर जोरदार टीका सुरू केली आहे.

यापूर्वी व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने पक्षातील माजी खासदारांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणानंतर संबंधित पदाधिकाऱ्याने पक्षाच्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली. तसेच या प्रकरणी नंदुरबार येथे गुन्हाही दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून भाजपावर निशाणा साधत पक्षाच्या अंतर्गत कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या वादावरून राज्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार आली आहे.

अशातच आता भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन आणि नंदुरबारमधील कथित ध्वनिफित प्रकरणात गुन्हा दाखल झालेले भाजप नेते विजय चौधरी यांच्यातील कथित दूरध्वनी संभाषणाची आणखी एक ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कथित संभाषणात चौधरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्याविषयी शिवराळ आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर करत असल्याचे ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे.

याच कथित संभाषणात चौधरी यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा राजीनामा पक्षाने घ्यावा, अशा आशयाचे वक्तव्य केल्याचाही दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, या संभाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी चौधरी यांना थांबवण्याचा किंवा आक्षेप नोंदवण्याचा प्रयत्न केल्याचे ऐकू येत नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. उलट चौधरी यांच्या बोलण्याला अप्रत्यक्षपणे महाजन यांच्याकडून प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोपही राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. मात्र, या कथित ध्वनिफितीच्या सत्यतेबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.

या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी संबंधित कथित ध्वनिफितीची आपण गंभीर दखल घेतली असून कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा दिला आहे. मी माझ्या वकिलांचा सल्ला घेत असून या प्रकरणात लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहे, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, या कथित ध्वनिफितींमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपाची अधिकृत भूमिका काय असेल, तसेच तपासादरम्यान आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे राजकीय वर्तुळासह राज्याचे लक्ष लागले आहे.

गटाराचे झाकण उघडल्यावर घाण ओसंडून वाहते तशी घाणेरडी भाषा या संभाषणातून बाहेर पडत आहे. भाजपात काम करणाऱ्या माझ्या महिला भगिनींनी सावध राहावे. कारण मुखात प्रभू श्रीरामांचे नाव घेऊन रावणाची वृत्ती असलेल्या लोकांसोबत तुम्ही काम करत आहात. –रोहिणी खडसे (महिला प्रदेशाध्यक्षा, राष्ट्रवादी शरद पवार गट)