जळगाव : लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकांमध्ये निर्विवाद यश मिळविल्यानंतर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या भाजपमध्ये मोठा उत्साह आहे. मात्र, संघटनात्मक नियुक्त्यांमुळे निर्माण झालेल्या नाराजीने पक्षांतर्गत गटबाजी वाढीस लागण्याची शक्यता दिसू लागल्याने पक्षात गटबाजी बिल्कुल खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देण्याची वेळ भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांकडून तालुका व जिल्हास्तरीय मेळाव्यांच्या माध्यमातून आपापल्या पक्षाच्या ताकदीची चाचपणी केली जात आहे. निवडणूक स्वतंत्रपणे लढावी लागल्यास त्यासाठी सज्ज राहण्याचे आदेशही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनेही जळगावात जिल्हा कार्यशाळा घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने भाजप सरकारचा यशस्वी प्रवास जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याच्या दृष्टीने सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रत्यक्षात त्यामध्ये जिल्हा परिषदेसह, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिकांच्या आगामी निवडणुकांच्या रणनीतीवरच जास्त चर्चा झाली.

पक्षाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यशाळेला उपस्थितीत नवनियुक्त मंडल प्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचंड यश मिळविण्यासाठी जोमाने कामाला लागण्याच्या सूचना केल्या. पक्षात नवीन तरूणांची फळी जोडा. सर्वांना सोबत घेऊन काम करा. गटबाजी बिल्कुल खपवून घेतली जाणार नाही. आमच्या स्तरावरील निवडणुका पार पडलेल्या आहेत. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये आम्ही त्यांना भक्कमपणे साथ देवू, असे मंत्री महाजन म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सुरू केलेल्या जनहिताच्या, स्वाभिमानाला बळ देणाऱ्या योजना आणि त्याचे लाभ घराघरात पोहोचले पाहिजेत. ते फक्त सरकारचे काम नाही तर हे आपलेही कर्तव्य आहे, असे महाजन यांनी सांगितले. यावेळी आमदार सुरेश भोळे, भाजप जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष डॅा. राधेश्याम चौधरी, जळगाव पूर्वचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, महिला प्रदेश उपाध्यक्षा डॅा. केतकी पाटील, प्रदेश पदाधिकारी अजय भोळे आदी उपस्थित होते.