नाशिक : बारामतीच्या बाबतीत किंवा एखाद्या कारखान्याबाबत कारवाई होऊ शकते, याची चाहूल आमदार रोहित पवार यांना आधीच लागलेली दिसते. आपण अडकलो आहोत, याची त्यांना जाणीव असावी. विनाकारण कोणावरही कारवाई केली जात नाही. मात्र, मोठे घबाड केले असेल, चोरी-चपाटी केली असेल किंवा काही गैरप्रकार केले असतील, तर कारवाई अटळ आहे, असा इशारा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिला.
वृक्षारोपण मोहिमेच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत असल्याने आपल्यावर कारवाई होऊ शकते, अशी भीती आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. त्याबाबत विचारले असता महाजन यांनी रोहित पवार यांना कारवाईची चाहूल आधीच लागलेली दिसते. बारामती किंवा एखाद्या कारखान्याबाबत कारवाई होईल, अशी त्यांना साशंकता आहे. म्हणजेच आपण अडकलो आहोत, याची त्यांना जाणीव आहे याकडे लक्ष वेधत विनाकारण कोणावरही कारवाई केली जात नाही असे स्पष्ट केले. यावेळी महाजन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ‘रामरक्षा आंदोलनावरही टिकास्त्र सोडले. वर्षभरात एवढा मोठा पक्ष होत्याचा नव्हता होण्याच्या मार्गावर पोहोचला आहे. मुंबईत सुरू केलेले रामरक्षा आंदोलन हे अस्तित्व टिकविण्यासाठीची केविलवाणी धडपड आहे, असा टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरेंना राजेशाहीची सवय…
ज्याला जायचे, त्याने जावे, अशी भूमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सातत्याने घेतली. आता दार बंद करण्याचा प्रयत्न होत असला, तरी पक्षात उरलेलेही थांबण्यास तयार नाहीत. पक्ष टिकवायचा असेल, तर राज्यभर फिरावे लागते, कार्यकर्त्यांमध्ये जावे लागते आणि संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्यक्ष काम करावे लागते, असे महाजन म्हणाले. आम्ही राजे आणि बाकी सर्व प्रजा, अशा अविर्भावात राहण्याची उद्धव ठाकरे यांना सवय झाली आहे. मात्र, आता प्रजाच राजा आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे, असेही त्यांनी नमूद केले.खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली. कोणाला ५० खोके, कोणाला २० खोके, असे मनाला वाटतील ते आकडे सांगण्यापेक्षा पक्षात उरलेले लोक सांभाळावेत. ‘ज्याला जायचे, त्याने जावे’ असे म्हणण्यापेक्षा संघटनेकडे लक्ष द्यावे. सकाळची कोल्हेकुई बंद करावी, असा टोला त्यांनी लगावला.
म्यानमारमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न
देशातील सुमारे ९०० तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून म्यानमारला नेण्यात आले असून त्यामध्ये काही तरुणींचाही समावेश आहे. तेथे त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याशी दोन-तीन वेळा दूरध्वनीवर संवाद साधला आहे. त्यांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारशी चर्चा केली आहे. त्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महाजन यांनी दिली.
