scorecardresearch

नाशिक: शालेय वाहनाखाली सापडून बालिकेचा मृत्यू

शाळेतून घरी सोडण्यासाठी आलेले वाहन (व्हॅन) मागे वळण घेत असताना चाकाखाली सापडून आठ वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला.

child-dead
प्रातिनिधिक छायाचित्र

शाळेतून घरी सोडण्यासाठी आलेले वाहन (व्हॅन) मागे वळण घेत असताना चाकाखाली सापडून आठ वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला. जेलरोडमधील पवार वाडी येथे हा अपघात झाला.

अपेक्षा भालेराव (आठ, हरिओम दर्शन सोसायटी, पवारवाडी) असे मृत शाळकरी मुलीचे नाव आहे. अपेक्षा ही नेहमीप्रमाणे आपल्या शाळेत गेली होती. सायंकाळी ती वाहनातून घरी परतली. वाहनातून उतरल्यानंतर चालकाने वाहन मागे घेतले. यावेळी ती मागील चाकाखाली सापडली. गंभीर जखमी झालेल्या अपेक्षाला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तत्पुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या घटनेला चालकाचे दुर्लक्ष कारणीभूत ठरल्याचा आरोप होत आहे. शालेय वाहनाने धडक दिल्याने ती चाकाखाली सापडल्याचे सांगितले जाते. या बाबत डॉ. सुनील मकासरे यांनी दिलेल्या माहितीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>नाशिक मनपाकडून पाटबंधारे विभागाला साडेआठ कोटी; पाणी करार वाद संपुष्टात आल्यावर मोहोर

दरम्यान, या घटनेमुळे शालेय वाहनांमधील असुरक्षित विद्यार्थी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. आधीच बहुतांश वाहनांमध्ये क्षमतेहून अधिक विद्यार्थी कोंबले जातात. त्यांना बसविताना व उतरविताना पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचे उपरोक्त घटनेतून दिसून आले. चिमुकली उतरल्यानंतर चालकाने कुठलीही खातरजमा न करता वाहन मागील बाजूला नेले. अनेक ठिकाणी शाळेबाहेरील रस्त्यालगत वाहने उभी केली जातात. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी धावपळ करीत आपली वाहने शोधतात. वाहनधारकांचा निष्काळजीपणा विद्यार्थ्याच्या जिवावर बेतू शकतो. प्रादेशिक परिवहन विभागही या असुरक्षित वाहतुकीकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-03-2023 at 19:39 IST