नाशिक विभागाचा निकाल ९९.६१ टक्के, केवळ ५७० विद्यार्थी अनुत्तीर्ण

नाशिक : करोनामुळे अंतिम परीक्षा न झालेल्या इयत्ता १२ वीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे मंगळवारी जाहीर झाला. नाशिक विभागाचा ९९.६१ टक्के निकाल लागला. विभागातील एक लाख ५१ हजार ७५४ पैकी एक लाख ५१ हजार ७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेत उत्तीर्णतेची टक्केवारी सर्वाधिक ९९.८० टक्के असून विज्ञान शाखेत ती ९९.४७ टक्के इतकी आहे. उत्तीर्णतेत नंदुरबार (९९.८२ टक्के) जिल्हा अव्वल ठरला असून जळगाव जिल्हा (९९.५४) पिछाडीवर राहिला. लेखी परीक्षा झाली नसल्याने अनुत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या नगण्य राहिली. विभागात केवळ ५७० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेत मुलींनी नेहमीप्रमाणे आघाडी घेतली.

करोनाच्या संकटामुळे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२ वीची २०२१ मधील परीक्षा रद्द करण्यात आली होती. विभागीय मंडळाने मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार इयत्ता १० वीत मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण आणि इयत्ता ११ वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण तसेच इयत्ता १२ वीच्या वर्षातील अंतर्गत मूल्यमापन, प्रथमसत्र, सराव परीक्षा, सराव चाचणी व तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापनातील गुणांच्या आधारे १२ वीसाठी विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान केले, अशी माहिती विभागीय सचिव राजेंद्र अहिरे आणि विभागीय अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी दिली.

नाशिक जिल्ह्याात ६८ हजार ५१६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ६८ हजार २२३ (९९.५७ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. धुळे जिल्ह्याात २२ हजार ५९९ पैकी २२ हजार ५४४ (९९.७५), जळगावमध्ये ४५ हजार ३५७ पैकी ४५ हजार १५० (९९.५४) आणि नंदुरबार जिल्ह्याात १५ हजार २८२ पैकी १५ हजार २५६ (९९.८२) अशी नियमित परीक्षार्थींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी आहे. मागील वर्षी विभागाचा ८८.८७ टक्के निकाल होता. त्याआधी म्हणजे मार्च २०१९ च्या परीक्षेत निकालाची टक्केवारी ८४.७७ टक्के इतकी होती. करोनामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणदान झाले. त्यामुळे उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली.

जुन्या अभ्यासक्रमाच्या आधारे पुनर्परीक्षार्थींच्या परीक्षेत सात हजार ७३५ पैकी सात हजार ७२२ म्हणजे ९९.४४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात नाशिक जिल्ह्याातील ३९९१ (९९.८२), धुळे ००१ (९९.९०), जळगाव १८९७ (९९.२६) आणि नंदुरबार जिल्ह्याात ८४० (९७.५६) टक्के पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. २०२१ मध्ये श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आला नाही. या विद्यार्थ्यांना असलेल्या दोन संधींमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नसल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.

विशेष प्राविण्यात ६७५२५ विद्यार्थी

विभागात ८४ हजार ३८४ मुलांपैकी ८४०२१ म्हणजे ९९.५६ टक्के उत्तीर्ण झाले. ६७ हजार ३७० मुलींपैकी ६७ हजार १५२ (९९.६७) उत्तीर्ण झाल्या. १२ वीच्या लेखी परीक्षेत नेहमी मुलींचे उत्तीर्ण प्रमाण अधिक असते. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर झालेल्या १२ वीच्या निकालात ही परंपरा कायम राहिली आहे. विशेष प्राविण्यासह ६७५२५, प्रथम श्रेणीत ७३४८५, द्वितीय श्रेणीत ९७९६ आणि उत्तीर्ण श्रेणीत ३६६ विद्यार्थी आहेत.

विशेष प्राविण्यात ६७५२५ विद्यार्थी

विभागात ८४ हजार ३८४ मुलांपैकी ८४०२१ म्हणजे ९९.५६ टक्के उत्तीर्ण झाले. ६७ हजार ३७० मुलींपैकी ६७ हजार १५२ (९९.६७) उत्तीर्ण झाल्या. १२ वीच्या लेखी परीक्षेत नेहमी मुलींचे उत्तीर्ण प्रमाण अधिक असते. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर झालेल्या १२ वीच्या निकालात ही परंपरा कायम राहिली आहे. विशेष प्राविण्यासह ६७५२५, प्रथम श्रेणीत ७३४८५, द्वितीय श्रेणीत ९७९६ आणि उत्तीर्ण श्रेणीत ३६६ विद्यार्थी आहेत.

शाखानिहाय उत्तीर्णतेची टक्केवारी

* विज्ञान शाखा – ९९.४७

* कला शाखा – ९९.८०

* वाणिज्य शाखा – ९९.८७

* व्यवसाय अभ्यासक्रम – ९९.७६