जळगाव – तापी नदीवरील जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पानंतर गिरणा नदीवरील सिंचन प्रकल्पाच्या पाणी पातळीतही चांगली वाढ होत आहे. दोन्ही प्रकल्पांच्या उपयुक्त साठ्यात अलिकडील दिवसात झालेली वाढ लक्षात घेता जवळपास अर्ध्या जळगाव जिल्ह्याचा शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत असलेला उपयुक्त पाणीसाठा आणि पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण लक्षात घेता, पाटबंधारे विभागाने हतनूर धरणाचे दोन दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले आहेत. सांडव्यातून नदीच्या पात्रात २५७८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने काठावरील अनेक गावांची पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या वर्षीपासून पाणी अडविण्यास सुरूवात झालेल्या तापीवरील शेळगाव बॅरेजचेही दोन दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले असून, त्यातून ५०४८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सातत्याने सुरू आहे. दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावसह भडगाव, एरंडोल, धरणगाव, अमळनेर व पारोळा व जळगाव तालुक्यातील दीडशेपेक्षा जास्त गावे तसेच चार नगरपालिकांच्या पाण्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाच्या पातळीतही बऱ्यापैकी वाढ झाली आहे.
१५ जून रोजी गिरणा धरणात २१.४४ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे २४ जूनअखेर या धरणातील उपयुक्त पाणीसाठा २६.५१ टक्क्यापर्यंत पोहोचला आहे. गिरणा धरण नाशिक जिल्ह्यात असले तरी त्याचा सर्वाधिक लाभ जळगाव जिल्ह्यास होतो. त्यामुळे गिरणेच्या पाणी पातळीत वाढ होत असताना, जिल्ह्यातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मध्यम प्रकल्पांमध्ये ठणठणाट
जळगाव जिल्ह्यात एकूण १४ मध्यम सिंचन प्रकल्प असून, त्यांची पाणी साठवण क्षमता ३१४.१५ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. १५ जून रोजी या सर्व मध्यम प्रकल्पांमध्ये २७.६८ टक्के उपयुक्त पाणी साठा होता. त्या तुलनेत २४ जून रोजीचा उपयुक्त साठा ३२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. पाणी साठ्यातील पाच टक्के वाढ ही सातपुड्यातून उगम पावणाऱ्या नद्यांवरील अभोरा, मंगरूळ, सुकी, गूळ या प्रकल्पांमुळे झाली. बहुळासह हिवरा, तोंडापूर, मन्याड, अंजनी, अग्नावती, भोकरबारी आणि बोरी या प्रकल्पात अजूनही पाण्याचा ठणठणाट कायम आहे