जळगाव : जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. फुलोऱ्यातील, शेंगा भरण्याच्या अवस्थेतील तसेच वाढीच्या स्थितीत असलेल्या विविध पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज आहे. अनेक ठिकाणी जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असल्याने दुपारच्या उन्हात पिके माना टाकू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर गिरणा धरणात तब्बल ९९ टक्क्यांवर पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेतीसाठी गिरणा धरणातून कालव्याद्वारे तातडीने एक आवर्तन सोडावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे खरीप हंगामाची सुरुवातच विलंबाने झाली. जिल्ह्यात अनेक भागांत जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून खरीप पेरणीला सुरुवात झाली. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण झाली आणि शेतकऱ्यांना हंगामाबाबत आशा निर्माण झाली. मात्र, पिकांची वाढ होऊन फुलोरा व शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या निर्णायक टप्प्यावर पावसाने अचानक पाठ फिरवली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाचा मोठा खंड पडल्याने जमिनीतील ओलावा कमी होत आहे. विशेषतः हलक्या व मध्यम प्रतीच्या जमिनीत पिकांना पाण्याचा ताण जाणवू लागला आहे. सकाळच्या वेळी पिके काहीशी तजेलदार दिसत असली तरी दुपारच्या उन्हात पाने वाकू लागणे, झाडे माना टाकणे आणि वाढ खुंटणे अशी स्थिती अनेक भागांत दिसून येत आहे.
पिकांना पाण्याची नितांत गरज
पूर्वहंगामी कपाशीची स्थिती सध्या बरी दिसत असली तरी कैऱ्या पोसण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. पावसाळी कपाशीलाही वाढीसह फुलपात्यांसाठी पाऊस गरजेचा आहे. या अवस्थेत पाण्याचा ताण बसल्यास कापसाच्या उत्पादनावर थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सोयाबीन, उडीद, मूग या पिकांमध्ये शेंगा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या काळात जमिनीत पुरेसा ओलावा राहणे अत्यंत आवश्यक असते. मात्र, पावसाचा खंड कायम राहिल्यास दाणे भरण्यावर परिणाम होऊन उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मका आणि ज्वारीलाही पाण्याची आवश्यकता असून, वाढीच्या अवस्थेत असलेल्या या पिकांवरही पावसाअभावी ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पाऊस झाला नाही, तर खरीप उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गिरणा धरणात ९९ टक्के पाणीसाठा
एकीकडे शेतातील पिके पाण्यासाठी आसुसलेली असताना दुसरीकडे गिरणा धरणात ९९ टक्क्यांवर पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करून कालव्याद्वारे एक आवर्तन सोडल्यास संकटात सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. गिरणा प्रकल्पात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन २९ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता प्रकल्पातून सुरू असलेला १,२३८ क्युसेक विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. धरणाचे सर्व वक्रद्वार बंद करण्यात आले आहेत. प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्यास पुन्हा विसर्ग वाढविण्यात येईल, असे पाटबंधारे उपविभाग चाळीसगावचे उपविभागीय अभियंता यांनी स्पष्ट केले आहे.
‘आवर्तन’ ठरेल पिकांसाठी संजीवनी
सध्या पावसाची परिस्थिती पाहता गिरणा धरणातील उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी नियोजनबद्ध वापर करण्याची मागणी पुढे आली आहे. कालव्याद्वारे एक आवर्तन सोडल्यास पिकांना आवश्यक असलेला संरक्षित ओलावा मिळू शकतो. त्यामुळे पिकांची सध्याची अवस्था लक्षात घेता हे आवर्तन केवळ पाणीपुरवठा न राहता खरीप हंगामाला वाचविण्यासाठीची संजीवनी ठरू शकते, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. धरणगाव, एरंडोल, जळगाव, पाचोरा, भडगाव, चोपडा आणि अमळनेर या तालुक्यांमध्ये पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. या भागांतील अनेक गावांमध्ये पिकांची अवस्था चिंताजनक आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर पिकांची निगा राखण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत; मात्र पावसाचा खंड आणखी वाढल्यास खर्च करून उभे केलेले पीक वाया जाण्याची शक्यता आहे.
जिल्हा प्रशासनाकडून निर्णयाची अपेक्षा
गिरणा धरणातील पाणीसाठा समाधानकारक असल्याने कालव्याद्वारे एक आवर्तन सोडण्याच्या मागणीबाबत जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पावसाची प्रतीक्षा करत आणखी काही दिवस गेले तर पिकांचे नुकसान भरून काढणे कठीण होऊ शकते. त्यामुळे पावसाचा अंदाज, धरणातील उपलब्ध साठा आणि लाभक्षेत्रातील पिकांची गरज यांचा समन्वय साधून तातडीने पाणी सोडण्याचे नियोजन करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. गिरणा धरणातील पाणीसाठा सध्या समाधानकारक असला तरी पावसाचा खंड कायम राहिल्यास खरीप हंगामापुढील संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काही दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
