नाशिक : ग्लासगो या शहराचे नाव नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात यापुढे कायमच लक्षात राहणार आहे. या शहराने आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात नाशिकला नवीन ओळख निर्माण करुन दिली आहे. त्यासाठी कारणही तसेच ठरले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आणि राष्ट्रकुल पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या दोन खेळाडूंनी पदक मिळविण्याची कामगिरी केली. सर्वेश कुशारेने रौप्यपदक मिळविल्याचा आनंद साजरा होत असतानाच दिलीाप गावित याने राष्ट्रकुल पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत थेट सुवर्णपदकापर्यंत मजल मारल्याची बातमी आली. आणि नाशिक खऱ्या अर्थाने ॲथलेटिक्स केंद्र होऊ लागल्याची जाणीव झाली.
ग्लासगो येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नशिक जिल्ह्यातील सर्वेश कुशारेने २.२५ मीटर उंच उडी मारुन देशाला रौप्यपदक मिळवून दिले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उंच उडीमध्ये रौप्यपदकापर्यंत मजल मारणारा सर्वेश हा भारताचा पहिलाच खेळाडू. नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगाव येथील श्री. डी. आर. भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा सर्वेश हा माजी विद्यार्थी. सर्वेशने केलेल्या कमगिरीबद्दल त्याचे आईवडील तसेच प्रशिक्षक रावसाहेब जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना ग्लासगोमधूनच नाशिकसाठी अजून एक चागंली बातमी आली.
नाशिकच्या पेठ या आदिवासी तालुक्यातील तोरण डोंगरी येथील दिलीप महादू गावित याने राष्ट्रकुल पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत १०० मीटर टी ४७ प्रकारात १०.७१ सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. दिलीपचा सुवर्णपदकापर्यंतचा प्रवास कठोर परिश्रम, अडथळे आणि जिद्दीचा राहिला आहे. तोरण डोंगरीसारख्या लहानशा आदिवासी गावातील गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेला दिलीप लहान असताना म्हणजे वयाच्याव पाचव्या वर्षी शेतात झाडावरून पडला. यामुळे हाताला गंभीर दुखापत झाली. ग्रामीण भाग असल्याने तातडीने उपचार न झाल्याने जखम चिघळली. अखेर त्याचा एक हात कापणे भाग पडले. आणि वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी दिलीपला अपंगत्व आले.
परंतु, अपंगत्वावर मात करुन दिलीप पुढे जात राहिला. शाळेत असतानाच प्रक्षिक्षकांनी दिलीपची धावण्यातील क्षमता ओळखली. दिलीपला योग्य प्रशिक्षण मिळाल्यास तो प्रगती करु शकतो, हे लक्षात घेऊन प्रशिक्षकांनी दिलीपच्या पालकांना समजाविले. आणि प्रशिक्षणासाठी दिलीपला पाठविण्यास तयार केले. दिलीपला प्रारंभी अपंगांसाठी वेगळ्या क्रीडा स्पर्धा असतात, हे माहीत नव्हते. तो सर्वसामान्य खेळाडूंमध्येच खेळत होता. विशेष म्हणजे, अपंग असूनही इतर सर्वसामान्य खेळाडूंना तो मागे टाकत असे. ग्लासगोमधील स्पर्धेत दिलीपने कमाल केली. पहिल्या ६० मीटरपर्यंत दिलीप आघाडीच्या स्पर्धकांपेक्षा मागे होता. परंतु, शेवटच्या ४० मीटरमध्ये त्याने जबरदस्त वेग वाढववा, आणि बघता बघता पुढे असलेल्या सर्वांना मागे टाकत सुवर्णपदकावर नाव कोरले. विशेष म्हणजे पावसामुळे धावपट्टी ओली असतानाही दिलीपने विपरित परिस्थितीत हे यश मिळविले. दिलीप हा प्रशिक्षक वैजनाथ काळे यांचा विद्यार्थी. त्यांनी घेतलेली मेहनत कामी आली.
