जळगाव : गोव्यातील वास्को द गामा आणि नवी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांदरम्यान दररोज धावणाऱ्या लोकप्रिय आणि वेगवान गोवा एक्स्प्रेसला जळगाव, भुसावळनंतर आता आणखी एका नव्या स्थानकावर थांबा मिळाला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी हा थांबा प्रायोगिक तत्त्वावर मंजूर केला असून, त्याची अंमलबजावणी ३० जानेवारीपासून सुरू देखील झाली आहे.
रेल्वेच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या सीमेलगत वसलेल्या बऱ्हाणपूर व परिसरातील हजारो रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. खंडव्याचे खासदार ज्ञानेश्वर पाटील यांनी बऱ्हाणपूरला गोवा एक्स्प्रेसचा थांबा मिळावा, यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रवाशांची वाढती संख्या, बऱ्हाणपूरचे व्यापारी व शैक्षणिक महत्त्व तसेच मध्य प्रदेश–महाराष्ट्र सीमावर्ती भागातील दळणवळणाची गरज लक्षात घेऊन त्यांनी हा मुद्दा वेळोवेळी रेल्वे मंत्रालयाकडे मांडला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने गोवा एक्स्प्रेसला बऱ्हाणपूर येथे थांबा मंजूर झाला आहे.
नवीन वेळापत्रकानुसार १२७७९ वास्को द गामा–हजरत निजामुद्दीन ही गाडी दररोज दुपारी ०१.२९ वाजता बऱ्हाणपूर रेल्वे स्थानकावर दाखल होऊन पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल. तर १२७८० हजरत निजामुद्दीन–वास्को द गामा ही गाडी दररोज सकाळी ०७.४९ वाजता बऱ्हाणपूर येथे थांबेल. या दोन्ही गाड्यांच्या थांब्यामुळे दिल्ली, गोवा तसेच उत्तर आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी बऱ्हाणपूर एक महत्त्वाचे स्थानक ठरणार आहे. यापूर्वी वास्को द गामा येथून सुटल्यानंतर हजरत निजामुद्दीनकडे जाणाऱ्या गोवा एक्स्प्रेसला जळगाव-भुसावळनंतर थेट खंडवा येथेच थांबा होता. मध्येच कुठेच न थांबणारी ही गाडी आता बऱ्हाणपुरला प्रवाशांची चढ-उतर करेल.
बऱ्हाणपूरसह आसपासच्या भागातील प्रवाशांना गोवा एक्स्प्रेसचा थेट लाभ इतकी वर्षे मिळत नव्हता. आता बऱ्हाणपूरला थांबा मिळाल्याने प्रवाशांचा वेळ, खर्च आणि गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. दरम्यान, हा थांबा प्रायोगिक स्वरूपाचा असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद, प्रवासी नियमित संख्या आणि तांत्रिक बाबींचा आढावा घेतल्यानंतर तो कायमस्वरूपी करण्याबाबत निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, गोवा एक्स्प्रेसचे बऱ्हाणपूर शहरात शुक्रवारी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रयत्नांचेही कौतुक झाले.
खंडव्याचे खासदार ज्ञानेश्वर पाटील यांनी गेल्या तीन वर्षांत खंडवा आणि बऱ्हाणपूर येथे १४ रेल्वे गाड्यांच्या थांब्यांना मंजुरी मिळवून दिली आहे. या व्यतिरिक्त, कोविड-१९ साथीच्या काळात नेपानगरमधील थांबा बंद झालेल्या बहुतेक गाड्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. खासदार पाटील हे बऱ्हाणपूर स्थानकावर गोवा एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी सातत्याने करत होते. तांत्रिक कारणांमुळे रेल्वे मंत्रालयाने सुरुवातीला बऱ्हाणपूर येथे थांबा देण्यास असमर्थता दर्शविली होती. परंतु, खासदार पाटील त्यांच्या मागणीवर ठाम राहिल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले.

