नाशिक – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मशताब्दी निमित्ताने २५ ते २९ एप्रिल या कालावधीत गोदावरी ते नर्मदा अशी जलयात्रा काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत २५ एप्रिल रोजी त्र्यंबकेश्वर येथून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे.

मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिक येथे भाजप कार्यालयात यासंदर्भात माहिती दिली. चोंडी येथूनही अशीच यात्रा निघणार आहे. ही यात्रा त्र्यंबकेश्वरहून निघालेल्या जलयात्रेला धुळे येथे मिळणार आहे. ही एकत्रित यात्रा मध्य प्रदेशातील महेश्वरकडे रवाना होईल, असे मंत्री विखे यांनी सांगितले. आमदार.प्रा. देवयानी फरांदे यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी या यात्रेच्या मार्गावर आपापल्या भागात रांगोळ्या तसेच सजावट करून पुष्पवर्षाव करत जल यात्रेचे जल्लोषात स्वागत करावे, असे आवाहन केले.

भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी महानगरपालिकेतील ७२ नगरसेवकांसह शहरातील तीनही आमदार, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या मतदारसंघात यात्रेचे भव्यदिव्य स्वागत करणार असल्याचे सांगितले. महापौर हिमगौरी आडके – आहेर यांनी या यात्रेची व्याप्ती वाढविण्यासाठी आपण सर्वोत्तरी मदत करू, असे सांगितले. नाशिक दक्षिण भाजप ग्रामीणचे अध्यक्ष सुनील बच्छाव यांनी त्र्यंबकेश्वर येथे यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी त्र्यंबकेश्वर व परिसरातील विविध आखाड्यांचे प्रमुख संत व पाचशे हून अधिक वारकरी उपस्थित राहतील, असे सांगितले.

दरम्यान, यात्रेला २५ एप्रिल रोजी त्र्यंबकेश्वर येथून सुरुवात झाल्यानंतर दुपारी एक वाजता नाशिक महानगरात पपया नर्सरी, मुंबई नाका, साईनाथ नगर चौफुली, इंदिरानगर परिसर, डीजीपी नगर, पुणे रोड, दुपारी दोन वाजता सिन्नर, दुपारी तीन वाजता संगमनेर येथे मुक्काम जलयात्रेचा मुक्काम राहील. दुसऱ्या दिवशी २६ एप्रिल रोजी संगमनेर येथून मार्गस्थ होऊन जोर्वे, उमरी आश्वी, दाढ बुद्रुक, बाबळेश्वर शिर्डी, पिंपरी निर्मळ, राहातामार्गे शिर्डी येथे मुक्कामास त्यानंतर २८ रोजी शिर्डी येथून घृष्णेश्वर दर्शन, कन्नड, चाळीसगाव व धुळे येथे मुक्काम. २९ एप्रिल रोजी धुळ्याहून मार्गस्थ होऊन शिरपूर येथे प्रयाण व महेश्वर मध्ये ही यात्रा पोहोचेल. या यात्रेचा समारोप मध्य प्रदेशातील महेश्वर येथे होणार असून समारोपासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री शिवराज चौहान हजर राहतील असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले