गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचा पर्याय; गंगापूर धरणाने तळ गाठला
दुष्काळामुळे गोदावरीतील दरुगधीयुक्त पाण्यातच भाविकांना पूजाविधी करावा लागत असल्याने रामकुंड परिसरात कूपनलिका खोदून या ठिकाणी पाणी आणण्याच्या महापालिकेच्या संकल्पनेला गोदाप्रेमी नागरी सेवा समितीने तीव्र विरोध दर्शविला आहे. त्याऐवजी पात्रात मागील भागात असणारे पाणी शुद्धीकरण प्रक्रिया करून रामकुंडात आणावे याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
गंगापूर धरणाने तळ गाठल्यामुळे कित्येक महिन्यांपासून नदीपात्रातून पाणी सोडणे बंद झाले आहे. यामुळे काही भागवगळता गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. देशभरातील भाविक अस्थी विसर्जनासाठी रामकुंड येथे येतात. त्या ठिकाणी साचलेल्या पाण्यास कमालीची दरुगधी येत आहे. या स्थितीत पूजाविधी करावा लागत असल्याने भाविकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या पाश्र्वभूमीवर, रामकुंडात पाणी आणण्यासाठी महापालिका वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करत आहे. त्या अंतर्गत नदीपात्रात कुपनलिका खोदून पाणी आणण्याचा विचार आहे. या प्रस्तावित कूपनलिकेसाठी गोपिका बाई तास परिसरातील जागा निश्चित केली जात आहे. त्यास गोदाप्रेमी नागरी कृती समितीने कडाडून विरोध दर्शविला आहे. त्याबाबतचे निवेदन समितीचे संस्थापक देवांग जानी यांनी महापालिका आयुक्तांना दिले. जवळपास दोन महिन्यासाठी रामकुंड परिसरात पाण्याची तात्पुरती व्यवस्था करणे आवश्यक आहे. कूपनलिकेसाठी निश्चित केलेला परिसर खडकाळ असल्याने यंत्रणेच्या साहाय्याने ते खोदणे अवघड आहे. त्यामुळे भूसुरुंगाद्वारे स्फोट घडवून ती प्रक्रिया पार पाडावी लागू शकते. याच परिसरात अहिल्यादेवी होळकर पूल आहे. कूपनलिकेसाठी भूसुरुंग स्फोट केल्यास त्याचा पुलाच्या बांधकामावर विपरीत परिणाम होऊ शकतो. वास्तविक, ब्रिटिशांनी बांधलेल्या या पुलाची मुदत कधीच संपुष्टात आली आहे. त्या संदर्भातील पत्रही तत्कालीन ब्रिटिश वास्तुविशारदांनी जिल्हा प्रशासनास पाठविले आहे. त्यामुळे या कामामुळे काही विपरीत घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे.
रामकुंड तात्पुरत्या स्वरूपात प्रवाही राहण्यासाठी अहिल्याबाई होळकर पुलाखालून ते आनंदवलीपर्यंत जलसाठा उपलब्ध आहे. पाणी सोडण्यासाठी पुलाखालील बंधाऱ्यास तीन दरवाजे आहे. देखभालीअभावी त्यातील दोन दरवाजे नादुरुस्त आहेत.
रामकुंड तात्पुरत्या स्वरूपात प्रवाही राहण्यासाठी अहिल्यादेवी होळकर पुलापासून ते आनंदवलीपर्यंत उपलब्ध पाण्याचा वापर करता येईल. पात्रात पाणी सोडण्यासाठी पुलाच्या खालील बंधाऱ्यात तीन दरवाजे (बंधारा) आहेत. त्यापैकी दोन नादुरुस्त आहे. त्यांची दुरुस्ती करून आणि कुंभमेळ्यात रामकुंडासाठी तयार केलेल्या जल शुद्धीकरण प्रकल्पाची यंत्रणा विशिष्ट ठिकाणी बसवून प्रक्रिया करून ते पाणी रामकुंड व इतर कुंडात सोडता येईल असा उपाय समितीने सुचविला आहे.
