जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोने-चांदीच्या दरात दिवाळीनंतर काही प्रमाणात स्थिरता दिसून आली होती. मात्र, लग्नसराईला सुरूवात होत नाही तितक्यात दोन्ही धातुंचे भाव अचानक गगनाला भिडल्याने ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

दिवाळीपूर्वी शहरात सोन्या-चांदीच्या दरांनी नवे उच्चांक गाठले होते. २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम तब्बल एक लाख ३५ हजार रूपयांपर्यंत पोहोचला होता, तर चांदीचा दर प्रति किलो एक लाख ९० हजार रूपयांपर्यंत इतका नोंदविण्यात आला होता. दरातील मोठ्या चढ-उतारानंतरही दोन्ही मौल्यवान धातूंचे वर्चस्व कायम राहिले होते. परिणामी, दिवाळीच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना किंमतींच्या झळा बसल्या आणि अनेकांनी नियोजित खरेदी थोडी कमी केली. या दरवाढीचा परिणाम सुवर्ण व्यवसायाच्या एकूण उलाढालीवर होऊन ती अंदाजे १० ते २० टक्क्यांनी घटली. दिवाळीच्या उत्सवानंतर मात्र बाजारात दर घसरण्याचा कल दिसून आला. सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये टप्प्याटप्प्याने घट होत गेली आणि हा कल साधारण आठ नोव्हेंबरपर्यंत कायम राहिला.

सुवर्ण बाजारपेठेत दिवाळीनंतर सोने-चांदीच्या दरवाढीला अचानक ब्रेक लागल्यानंतर महागाईने त्रस्त ग्राहकांना काहीअंशी दिलासा मिळाला. दोन्ही धातुंच्या दरवाढीला दिवाळीनंतर लागलेला लगाम तात्पुरता असेल की दीर्घकालीन, याकडे ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांचे लक्ष वेधले गेले. प्रत्यक्षात, लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोन्याच्या बाजाराने पुन्हा वेग पकडला आहे. मागणी वाढल्याने सोन्याचे दर पुन्हा एकदा उंचावले असून, सामान्य ग्राहकांसाठी सोने खरेदी करणे अधिकच अवघड बनले आहे. सतत वाढणाऱ्या किमतींमुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय परंपरेनुसार लग्न, साखरपुडा किंवा इतर शुभ प्रसंगांमध्ये सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या हंगामात सोन्याची मागणी नैसर्गिकरित्या वाढत जाते. सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, सध्याच्या बाजारस्थितीत सोन्याच्या दरांत आणखी चढ-उतार दिसू शकतात. लग्नसराईमुळे बाजारात पुन्हा उत्साह परतला असून, त्यामुळे सोन्याच्या किमतींना नव्याने आधार मिळाला आहे. येत्या काही दिवसांत सोन्याचा दर पुन्हा १.३० लाखांपर्यंत आणि चांदीचा दर १.७० लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सराफा बाजारातील चढ-उतार लक्षात घेता २२ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर देखील प्रति १० ग्रॅम १.२५ लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोन्यात किती दरवाढ ?

शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आठ नोव्हेंबरला २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २३ हजार ९०९ रूपयांपर्यंत होते. त्यानंतर मात्र दरात वाढ होण्यास सुरूवात झाली. आणि सोन्याचे दर मंगळवारपर्यंत जीएसटीसह एक लाख २८ हजार ०२९ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले. तीनच दिवसांत सोन्यात तब्बल ४१२० रूपयांची वाढ नोंदवली गेली.

चांदीत किती दरवाढ ?

शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आठ नोव्हेंबरला चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५४ हजार ५०० रूपयांपर्यंत होते. त्यानंतर मात्र चांदीच्या दरात वाढ होण्यास सुरूवात झाली. आणि चांदीचे दर मंगळवारपर्यंत जीएसटीसह एक लाख ६१ हजार ७१० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले. तीनच दिवसांत चांदीत तब्बल ७२१० रूपयांची वाढ नोंदवली गेली.