जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात बऱ्याच दिवसांनी मोठी घट झाली होती. सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी दोन्ही धातुंच्या दरातील घसरण कायम राहिल्याने उत्साहित झालेल्या ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमती सातत्याने वाढत असल्याने खरेदीदारांमध्ये चिंता पसरली होती. तथापि, सोने आणि चांदीचे दर आता कमी होत आहेत. ज्यामुळे खरेदीदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, गुंतवणूकदारांसाठी सोन्या-चांदीच्या किमतींतील घसरण चिंतेची बाब ठरत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील हालचाली, अमेरिकन डॉलरची मजबुती तसेच मध्यवर्ती बँकांच्या धोरणांचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या दरांवर होत असतो. मागील काही काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्थिरतेचे वातावरण असल्याने सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून मोठ्या प्रमाणात पाहिले जात होते. आणि त्यामुळे त्याच्या भावात बरीच वाढ झाली होती. मात्र, आता जागतिक बाजारपेठेत काही प्रमाणात स्थिरता निर्माण होत असल्याने सोन्याची मागणी कमी झाली आहे. त्याचा परिणाम थेट किमतीवर दिसून येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
सोने किती स्वस्त झाले ?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरूवारी १२ हजार ३६० रुपयांची वाढ झाल्याने २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम एक लाख ८२ हजार ८२५ रुपयांपर्यंत पोहचले होते. परंतु, शुक्रवारी दिवसभरात तब्बल १० हजार ८१५ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ७२ हजार रुपयांपर्यंत घसरले होते. शनिवारी आठवड्याच्या आणि महिन्याच्या शेवटी सकाळी बाजार उघडल्यावर आणखी ८२४० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६३ हजार ७७० रूपयांपर्यंत घसरले. दोनच दिवसांत सुमारे १९ हजार रूपयांनी सोने स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला.
चांदी किती स्वस्त झाली ?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी एका दिवसात २० हजार ६०० रुपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो चार लाख सहा हजार ८५० रुपयांच्या उचांकापर्यंत पोहचले होते. मात्र, चांदीच्या वाढत्या दराला शुक्रवारी अटकाव झाला. दिवसभरात तब्बल ५६ हजार ६५० रुपयांची घट नोंदवली गेल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो तीन लाख ५० हजार २०० रुपयांपर्यंत घसरले होते. शनिवारी सकाळी बाजार उघडल्यावर आणखी ३० हजार ९०० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदी जीएसटीसह प्रति किलो तीन लाख १९ हजार रूपयांपर्यंत घसरली. दोनच दिवसांत चांदी सुमारे ८७ हजार ५५० रूपयांनी स्वस्त झाल्याने ग्राहकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

