जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घट नोंदवली गेल्याने ग्राहकांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला होता. मात्र, मंगळवारी दोन्ही धातुंच्या दरात पुन्हा उलटफेर झाल्याने त्याची झळ ग्राहकांना सोसावी लागली. सुवर्ण व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली.

गेल्या चार दिवसांपासून सतत घसरत असलेल्या सोन्याच्या किमतींना मंगळवारी अखेर दिलासा मिळाला. अमेरिकेने भारतावरील आयात कर २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोन्याच्या दरांमध्ये किंचित का असेना पण वाढ पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ३.९६ टक्क्यांनी वाढून १,४७,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी सोन्याचा भाव १,४१,९०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. याआधी गुरुवारी सोन्याने १,८०,७७९ रुपये प्रति १० ग्रॅम असा उच्चांक गाठला होता. मात्र, त्यानंतर सलग काही दिवस किमतींमध्ये घसरण झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतींमध्ये चढउतार दिसून आले. स्पॉट सोन्याचा भाव मंगळवारी सुमारे ४ टक्क्यांनी वाढून ४,८३० डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचला. मात्र, नंतर तो घसरून ४,७८१.६० डॉलर प्रति औंसवर आला.

सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, अमेरिकेच्या कर कपातीच्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांचा कल पुन्हा सोन्याकडे वळताना दिसत आहे. तसेच जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि चलन बाजारातील हालचाली यामुळेही सोन्याच्या दरांवर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. पुढील काळात आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सोन्याच्या किमतींची दिशा अवलंबून राहण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात डॉलरच्या मूल्यात सुरू असलेले चढउतार, अमेरिका-भारत व्यापार संबंध अधिक मजबूत होण्याबाबत निर्माण झालेली सकारात्मक अपेक्षा आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वाढता कल, यामुळे सोन्याच्या किमतींना आधार मिळत आहे.

सोन्याच्या दरात काय बदल ?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी २४ कॅरेट सोने ८२४० रूपयांची घट झाल्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६३ हजार ७७० रूपयांपर्यंत घसरले होते. सोमवारी दिवसभरात आणखी ७२१० रूपयांची घट नोंदवली गेल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५६ हजार ५६० रूपयांपर्यंत घसरले. मात्र, मंगळवारी सकाळी बाजार उघडल्यावर दरात ३०९ रूपयांची किंचित सुधारणा झाली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५६ हजार ८६९ रूपयांपर्यंत पोहोचले.

चांदीच्या दरात काय बदल ?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी तब्बल ४१ हजार २०० रूपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो तीन लाख ९ हजार रूपयांपर्यंत घसरले होते. सोमवारी दिवसभरात आणखी ३३ हजार ९९० रूपयांची घट नोंदवली गेल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७५ हजार १० रूपयांपर्यंत घसरले. मात्र, मंगळवारी सकाळी बाजार उघडल्यावर दरात ३०९० रूपयांची सुधारणा झाली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७८ हजार १०० रूपयांपर्यंत पोहोचले.