जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तेजीत असलेल्या सोने आणि चांदीने गुरूवारी पुन्हा सर्वकालीन उच्चांक केले. पैकी सोने दोन लाखांच्या जवळपास पोहोचले, तर चांदी इतिहासात पहिल्यांदा चार लाखांवर गेल्याने ग्राहकांना मोठा धक्का बसला. सुवर्ण व्यावसायिकांनीही डोक्याला हात लावून घेतला.
आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्सवर सोन्याच्या वायद्यांनी ऐतिहासिक झेप घेतली असून, प्रथमच प्रति औंस ५,६०० अमेरिकी डॉलर्सचा टप्पा पार केला आहे. एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा दर २८६.६ डॉलर्स म्हणजेच ५.४ टक्क्यांनी वाढून ५,६२६.८ डॉलर्स प्रति औंस या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. याचबरोबर, कॉमेक्समध्ये चांदीच्या वायद्यांच्या किमतींमध्येही वाढ झाली असून, त्या ११९.५१ डॉलर्स प्रति औंस या नव्या विक्रमावर स्थिरावल्या आहेत. सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, चांदीच्या औद्योगिक मागणीत झालेली वाढ आणि अमेरिकी डॉलरमधील कमजोरी यामुळे चांदीला अधिक पाठबळ मिळाले आहे. अलीकडच्या सत्रांत तिने सोन्यापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे, यूएस फेडरल रिझर्व्हने त्यांच्या ताज्या बैठकीत व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी चालू चलनवाढीच्या दबावांबद्दल आणि देशाच्या आर्थिक आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे, ज्यामुळे समष्टी आर्थिक जोखमींपासून बचाव म्हणून सोन्याचे आकर्षण मजबूत झाले आहे.
सोन्याचे दर आता कुठपर्यंत ?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी दिवसभरात ७२१ रूपयांची घट नोंदवली गेल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६४ हजार ४९१ रूपयांपर्यंत खाली आले होते. मात्र, बुधवारी दिवसभरात ५९७४ रूपयांची वाढ नोंदवली गेल्यामुळे सोन्याच्या दराने तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ७० हजार ४४५ रूपयांचा सर्वकालीन उच्चांक केला होता. गुरूवारी सकाळी बाजार उघडल्यावर तब्बल ११ हजार ८४५ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याच्या दराने तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ८२ हजार ३१० रूपयांचा ऐतिहासिक उच्चांक केला.
चांदीचे दर आता नेमके किती ?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी २० हजार ६०० रूपयांची घट नोंदवली गेल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो तीन लाख ६० हजार ५०० रूपयांपर्यंत घसरली होती. परंतु, बुधवारी दिवसभरात पुन्हा २५ हजार ७५० रूपयांची वाढ नोंदवली गेल्यामुळे चांदीने जीएसटीसह प्रति किलो तीन लाख ८६ हजार २५० रूपयांचा सर्वकालीन उच्चांक केला होता. गुरूवारी सकाळी बाजार उघडल्यावर आणखी २० हजार ६०० रूपयांचा वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीच्या दराने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम चार लाख सहा हजार ८५० रूपयांचा ऐतिहासिक उच्चांक केला.

