जळगाव : शहरातील सराफ बाजारात मंगळवारी ५१५ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा ९९ हजार ३९५ रुपयांपर्यंत पोहोचले होते. बुधवारी त्यात ५१५ रुपयांची घट झाल्याने सोन्याचे दर प्रतितोळा ९८ हजार ८८० रुपयांपर्यंत खाली आले. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना थोडाफार दिलासा मिळाला.
दरवाढीमुळे ग्राहकांच्या सोने खरेदी करण्याच्या क्षमतेवर काही दिवसांपासून परिणाम झाला असला, तरीही सोन्याचे सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व अजूनही कायम आहे. त्यामुळे दरवाढीनंतरही अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सोन्याच्या बाजारात बऱ्यापैकी उत्साह दिसून आला. मंगळवारी सोने दरात प्रतितोळा ५१५ रुपयांची वाढ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोने आणखी किती वधारते, त्याकडे ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांचे लक्ष लागले होते. प्रत्यक्षात बुधवारी बाजार उघडताच पुन्हा ५१५ रुपयांची घसरण सोने दरात झाली. दुपारपर्यंत सोन्याचे दर तेच कायम राहिल्याने सराफ बाजारातील ग्राहकांवर त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.
सध्या सोन्याचे दर कधी अचानक वाढत आहेत तर कधी अचानक घसरत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या आयात शुल्कामुळे तसेच अमेरिका व चीनमधील वाढत्या व्यापार तणावामुळे हे सर्व घडत असल्याचे सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय, भू-राजकीय तणाव आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरणांमुळे देखील सोन्याचे दर अस्थिर झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेला (१० मे) सोन्याचा दर जीएसटीसह प्रतितोळा ७५ हजार ५०० रुपये इतका होता. त्यातुलनेत यंदाच्या अक्षय्य तृतीयेला सोने सुमारे २३ हजार ३८० रुपयांनी महाग आहे.
चांदीच्या दरात १०३० रुपयांची वाढ
जळगावमध्ये मंगळवारी १०३ रुपयांची किरकोळ घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रतिकिलो ९९ हजार ९१० रुपयांपर्यंत खाली आले होते. मात्र, अक्षय्य तृतियेच्या दिवशी बुधवारी पुन्हा १०३० रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने चांदी एक लाख ९४० रुपयांपर्यंत पोहोचली. त्यामुळे ग्राहकांची काहीअंशी निराशा झाली.